मुंबई : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गमध्ये खेळवला जातोय. दरम्यान गेल्या काही सामन्यांपासून टीम इंडियाचे खेळाडू अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा खेळ खराब असल्याने सतत टीका होताना दिसतेय. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात दोघांना चांगला खेळ करता आला नसल्याने सुनिल गावस्कर यांनीही नाराजी व्यक्त केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान विराट कोहलीचा सध्याचा स्कोर पुजारा आणि रहाणेप्रमाणेच आहे, मात्र त्याला कोणी का प्रश्न करत नाही असा थेट सवाल माजी गोलंदाज आशिष नेहरा याने केला आहे.


नेहरा म्हणाला, "विराटने देखील गेल्या काही सामन्यांमध्ये चांगला स्कोर केलेला नाही. कारण तो कर्णधार आहे म्हणून त्यावर कोणी पुजारा आणि रहाणेप्रमाणे प्रश्न उपस्थित करत नाही."


नेहराला एका शो मध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसंदर्भात प्रश्न करण्यात आला. यावेळी नेहरा म्हणाला, "गेल्या काही काळातील आकडेवारी पाहिली तर विराट कोहलीनेही मोठी धावसंख्या उभारलेली नाही. मात्र तो कर्णधार असल्याने त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. विराट कोहलीचा खेळ पूर्णपणे वेगळा असला तरी त्याने भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केलं आहे."


नेहरा पुढे म्हणाला, "चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये नाहीत. पण सीरीजच्या मध्येच कोणालाही वगळणं योग्य नाही. जर तुम्ही या दोघांना सुरुवातीला संधी दिली असाल तर शेवटच्या कसोटीतही तुम्ही संधी द्यायला हवी. जर तुम्ही अजिंक्य रहाणेसारख्या खेळाडूला बाहेर ठेवत असाल तर एका सामन्याने निर्णय घेऊ नका, संपूर्ण सीरीज पहा."


जवळपास गेल्या 2 वर्षांपासून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला मोठी खेळी करता आली नाहीये. दोघांनीही या काळात सुमारे 25 च्या सरासरीने रन्स केल्या आहेत. तर विराट कोहलीने 2019 पासून एकंही शतक झळकावलेलं नाही, 2021 मध्ये तो तिन्ही फॉरमॅटमध्ये 1000 धावा करू शकला नाही.