कोलकाता : भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीची बुधवारी कोलकाता पोलिसांनी तीन तास चौकशी केली. या चौकशीनंतर शमीला पोलिसांनी सोडून दिलं तसंच आयपीएलमध्ये खेळण्याचीही परवानगी दिली. शमीची बायको हसीन जहांनं त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर शमीची चौकशी करण्यात आली. आयपीएलमध्ये शमी दिल्लीच्या टीमकडून खेळतो. कोलकात्याविरुद्धच्या मॅचसाठी शमी इकडे आला होता. म्हणून त्याला चौकशीसाठी कोलकात्यामध्येच थांबवण्यात आलं. शमीच्या आयपीएल खेळण्यावर आमची कोणतीही हरकत नाही. पण पुन्हा चौकशीची गरज भासली तर आम्ही त्याला पुन्हा बोलवू, असं कोलकाता पोलीस म्हणाले आहेत. शमीला आम्ही चौकशीला कधीही बोलवू शकतो पण सध्या तरी त्याची गरज नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं.


शमीचं पोलिसांना सहकार्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन तासांच्या चौकशीमध्ये शमीनं संपूर्ण सहकार्य केलं, असं कोलकाता पोलीस म्हणाले. आज रात्री शमी पुन्हा दिल्लीच्या टीममध्ये सहभागी होईल, अशी माहिती मिळत आहे. २१ एप्रिलला दिल्लीची मॅच बंगळुरूविरुद्ध होणार आहे. या चौकशीनंतर शमी माध्यमांशी बोलला नाही.


शमीच्या भावाचीही चौकशी


हसीन जहांच्या तक्रारीनंतर शमीचा मोठा भाऊ हसीब अहमद याचीही चौकशी करण्यात आली. या दोघांची वेगवेगळी तशीच एकत्रही चौकशी करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. हसीन जहांनं खळबळजनक आरोप केल्यानंतर शमी पहिल्यांदाच कोलकात्यामध्ये आला होता.


पत्नीचे शमीवर गंभीर आरोप


मोहम्मद शमीनं घरगुती हिंसाचार केला. त्याचे अनेक महिलांशी संबंध आहेत. तसंच त्यानं मॅच फिक्सिंग केलं, असे अनेक आरोप हसीन जहांनं केले होते. यातल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपांची बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकानं चौकशी केली. या चौकशीनंतर शमीला क्लीन चीट देण्यात आली. या चौकशीदरम्यान शमीचा बीसीसीआयसोबतच्या कराराचं नुतनीकरणही थांबवण्यात आलं होतं. क्लीन चिट मिळाल्यानंतर मात्र बीसीसीआयनं शमीशी पुन्हा नव्यानं करार केला.