मुंबई : क्रिकेट जगतात अनेक खेळाडू पुढे येतात, पण भारतीय क्रिकेट संघात फार कमी लोकांनाच स्थान मिळतं आणि ते टिकवणंही जमतं. स्थानिक क्रिकेट संघांपासून थेट देशाच्या संघात स्थान मिळवण्यापर्यंतचा हा प्रवास तसा सोपा नाही. पण, तोच प्रवास करत पुढे आलेल्या एका खेळाडूला सध्या अपयशाचाच सामना कराला लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या क्रिकेट संघात तर त्याला स्थान मिळवणं कठीणच झालं आहे. असं असतानाच आता आयपीएल संघातही त्याला खेळण्याची संधी दिली जात नसल्याचं पाहायला मिळत आहे. हा खेळाडू म्हणजे गोलंदाज कुलदीप यादव. 


अतिशय चांगली गोलंदाजी करुनही त्याला वर्ल्ड कप टी20 च्या संघातून डावलण्यात आलं. कुलदीपनं त्याच्या गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला आहे. पण, आता मात्र त्यालाच संघातून डावलण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. 


हल्लीच समालोचक आकाश चोप्रा याला दिलेल्या मुलाखतीत त्यानं संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यामध्ये त्यानं आपल्याला संधी मिळत नसल्याचाही उल्लेख केल्याचं म्हटलं जात आहे. अतिशय गंभीक आणि आरोपवजा वक्तव्य करत कुलदीप म्हणाला, 'IPL मध्ये तुमच्याशी बोललं जात नाही. मागच्या वेळी माझ्याशी कोणच बोललं नाही आणि मला सामना खेळण्याचीही संधी मिळाली नाही. असं वाटतं की तुम्ही सामना जिंकवूच शकत नाही. जेव्हा पर्याय जास्त असतात तेव्हा अशी परिस्थिती उदभवते. केकेआरच्या संघाकडे फिरकी गोलंदाजांचे अनेक पर्याय आहेत.'


केकेआरच्या कर्णधारावर निशाणा 
कोलकाता संघाच्या कर्णधारावर म्हणजेच इयॉन मॉर्गनवर निशाणा साधत कुलदीप म्हणाला, 'परदेशी कर्णधाराशी फारसा संवाद साधला जात नाही. ते तुम्हाला समजून घेत नाहीत. पण, भारतीय कर्णधाराशी तुम्ही मोकळेपणानं बोलू शकता. रोहित शर्मासारख्या कर्णधाराला, मी अधिक उत्तम कामगिरीसाठी काय करावं असं विचारू शकता'.  


आपल्याला संघात जितकी संधी मिळाली, तितकी गोलंदाजी देण्यात आली नव्हती असं म्हणत आपण राहुल द्रविडचा सल्लाच हाताशी घेत पुढं जात असल्याचं कुलदीपनं स्पष्ट केलं. 


युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीकडे भारतीय क्रिकेट संघातील हुकमी एक्का म्हणून पाहिलं जात होतं. पण, टी20 विश्व चषकासाठी मात्र या दोघांनाही संघातून बाहेरची वाट दाखवण्यात आली. धोनीच्या निवृत्तीनंतरच या दोघांच्याही कारकिर्दीला उतरती कळा लागली असं म्हणायला हरकत नाही.