`ओव्हरथ्रोच्या ६ रन देणं चूक पण`... वर्ल्ड कप फायनलच्या गोंधळावर धर्मसेना बोलले
१४ जुलैला झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला.
मुंबई : १४ जुलैला झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातली मॅच टाय झाली. त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली, अखेर सुपर ओव्हर देखील टाय झाल्यामुळे इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्री मारल्यामुळे त्यांना विजेता घोषित करण्यात आलं.
वर्ल्ड कप फायनलच्या मोक्याच्या क्षणी शेवटच्या ओव्हरमध्ये अंपायर कुमार धर्मसेना यांनी केलेली चूक न्यूझीलंडला महागात पडली. ओव्हर थ्रोच्या ५ रन देण्याऐवजी धर्मसेना यांनी ६ रन दिल्या. या सगळ्या वादावर अखेर धर्मसेना यांनी मौन सोडलं आहे. 'टीव्हीवर रिप्ले बघितल्यानंतर आता माझा निर्णय चुकल्याचं मी कबूल करतो. पण मैदानामध्ये टीव्ही रिप्ले बघण्याची सोय नसते. हा निर्णय घेतल्याचं मला अजिबात पश्चाताप किंवा खेद नाही,' असं धर्मसेना श्रीलंकेतलं वृत्तपत्र संडे टाईम्सशी बोलताना म्हणाले.
'मी मैदानात असलेल्या दुसऱ्या अंपायरचा सल्ला घेतला. जो इतर अंपायर आणि मॅच रेफ्रीनेदेखील ऐकला. ते टीव्ही रिप्ले बघू शकत नव्हते. बॅट्समनने दुसरी रन पूर्ण केल्याचं या सगळ्यांनी मान्य केलं. यानंतर मी निर्णय दिला,' असं वक्तव्य धर्मसेना यांनी केलं.
मैदानात नेमकं काय झालं?
शेवटच्या ३ बॉलमध्ये इंग्लंडला विजयासाठी ९ रनची गरज होती. तेव्हा बेन स्टोक्सने मिड विकेटच्या दिशेने बॉल मारला. दुसरी रन घेत असताना मार्टिन गप्टीलने केलेला थ्रो स्टोक्सला लागला आणि बाऊंड्रीच्या पार गेला. यानंतर अंपायरनी स्टोक्सने धावलेल्या २ रन आणि ओव्हर थ्रोच्या ४ रन अशा एकूण ६ रन दिले.
अंपायरनी घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याचं नंतर ऑस्ट्रेलियाचे माजी अंपायर सायमन टॉफेल यांनी सांगितलं. आयसीसीच्या १९.८ नियमानुसार जर ओव्हर थ्रोमुळे बॉल बाऊंड्रीवर जात असेल तर त्यामध्ये बॅट्समनने पूर्ण केलेल्या रन जोडल्या जातात. जर फिल्डरने थ्रो फेकायच्या आधी बॅट्समननी एकमेकांना क्रॉस केलं नसेल, तर ती रन जोडली जाणार नाही.
मार्टिन गप्टीलने जेव्हा थ्रो केला तेव्हा बेन स्टोक्स आणि आदिल रशीद यांनी दुसऱ्या रनसाठी एकमेकांना क्रॉस केलं नव्हतं. तरीही अंपायरनी इंग्लंडला २ रन आणि ओव्हर थ्रोच्या ४ रन अशा एकूण ६ रन दिल्या. अंपायरनी या परिस्थितीमध्ये इंग्लंडला ५ रन देणं आणि आदिल रशीद स्ट्राईकवर असणं अपेक्षित होतं. पण पुढच्या बॉलला पुन्हा स्टोक्सच स्ट्राईकवर आला. यामुळे मॅचच्या निकालावरही परिणाम झाला.