`राहुल द्रविड-झहीर खानचा जाहीर अपमान`
राहुल द्रविड आणि झहीर खान या दोघांचा जाहीर अपमान झाला आहे.
मुंबई : राहुल द्रविड आणि झहीर खान या दोघांचा जाहीर अपमान झाल्याचं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या बीसीसीआयच्या क्रिकेट समितीचे माजी सदस्य रामचंद्र गुहांनी केलं आहे. द्रविड आणि झहीर खानची सल्लागार म्हणून केलेली नियुक्ती बीसीसीआयनं रोखून धरली आहे. त्यामुळे रामचंद्र गुहांनी ही टीका केली आहे. याआधी अनिल कुंबळेलाही अशीच वागणूक दिली असल्याचं गुहांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणलं आहे.
राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि झहीर खान हे उत्तम खेळाडू आहेत. देशासाठी खेळताना त्यांनी सर्वस्व पणाला लावलं. त्यांचा असा जाहीर अपमान करणं योग्य नसल्याचं गुहा म्हणालेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
टीम इंडियाच्या परदेश दौ-यासाठी बॅटिंग कोच म्हणून निवड झालेल्या राहुल द्रविड आणि बॉलिंग कोच झहीर खानच्या निवडीला प्रशासकीय समितीनं रेड सिग्नल दाखवला. त्यांच्या निवडीबाबत आता 22 जुलैला अंतिम निर्णय घेण्यात येईल.
सल्लागार समितीनं द्रविड आणि झहीरचं नाव सुचवलं होतं. मात्र, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा करुनच निर्णय घेण्यात येणार असल्याचं प्रशासकीय समितीनं म्हटलंय.
बीसीसीआय अध्यक्ष सीके खन्ना, अमिताभ चौधरी, डायना इडुलजी आणि राहुल जोहरी यांची 19 जुलैला बैठक होईल. दरम्यान, राहुलप्रमाणेच झहीरची निवडही परदेश दौ-यासाठीच करण्याच आल्याचं बीसीसीआयकडून स्पष्ट केलं गेलं.
मात्र, आता शास्त्रींनी आपला आवडता सपोर्टींग स्टाफ निवडण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. शास्त्रींचा बॉलिंग कोचसाठी भारत अरुण यांच्यासाठी आग्रह आहे. त्यामुळेच हा सगळा खटाटोप सुरु असल्याची चर्चा आहे.