मुंबई :  अंतिम सामना असावा तर असा...थरारक सामना असावा तर असा... अगदी एखाद्या सस्पेन्स सिनेमासारखा... महामुंबई कबड्डी लीगचा अंतिम सामनाही तसाच झाला. श्र्वास रोखून बसलेल्या हजारो कबड्डीप्रेमींचे हृदयाचे ठोके चुकवत शेवटच्या चढाईपर्यंत जेतेपदाची माळ कुणाच्या गळ्यात हा सस्पेन्स कायम ठेवत कुर्ला किंग्जने बाजी मारली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटच्या चढाईला 23-24 अशा गुणांनी पिछाडीवर असलेल्या आपल्या संघाला विजयश्री मिळवून देण्यासाठी चढाई करणारा निनाद तावडे गुण मिळविण्याच्या प्रयत्नात स्वताच लॉबीबाहेर पडला आणि डी ऍण्ड डी टायटन्सचे जेतेपदाचे स्वप्न भंग झाले.


 पूर्ण स्पर्धेत आपल्या बहारदार आणि जोरदार खेळाचा दरारा दाखविणाऱया कुर्ला किंग्जने 25-23 अशा निकालासह पहिल्यावहिल्या महामुंबई कबड्डी लीग स्पर्धेवर आपलेच राज्य प्रस्थापित केले. संघाला जेतेपद मिळवून देण्यात अपयशी ठरलेला निनाद स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला तर कुर्ला किंग्जला अजिंक्यपद मिळवून देणाऱया दादा आव्हाडने सर्वोत्तम चढाईपटूचा मान पटकावला. अवघ्या स्पर्धेत आपल्या जबरदस्त पकडींनी चढाईपटूंमध्ये दहशत निर्माण करणारा धीरज धरिवले याने सर्वोत्तम पकडीचा पुरस्कार संपादला.
 
 
 सह्याद्री नगरातील नामदेवराव कदम क्रीडानगरीने पुन्हा एकदा कबड्डीचा खराखुरा थरार अनुभवला. भाजपा चारकोप विधानसभा, अभिनव कला क्रीडा अकादमी आणि ओ.एच. मिडिया हाऊस आयोजित महामुंबई कबड्डी लीगच्या अंतिम लढतीने सर्वांचीच मनं जिंकली. लालबाग लायन्सवर थरारक सामन्यात मात करून अंतिम फेरीत धडक मारणारा डी ऍण्ड डी टायटन्सचे खेळाडू थोडेस थकलेले होते. तासाभराच्या विश्रांतीनंतरच अंतिम सामन्यासाठी त्यांचा संघ मैदानात उतरत असल्यामुळे त्यांच्यावर खूप दबाव होता. पण प्रत्यक्षात खेळ सुरू झाला आणि मैदानात फक्त डी ऍण्ड डी टायटन्सच्या नावाचा गुणघोष सुरू झाला. 
 
 
 निनाद तावडे आणि  आकाश गायकवाड यांनी वेगवान चढाया करीत पहिल्या दोन मिनीटातच 4-0 अशी आघाडी घेत आपला दबदबा निर्माण केला. पहिल्या डावात डी ऍण्ड डी टायटन्सने अद्भुत खेळाचे दर्शन घडवत कुर्ला किंग्जला डोकेच वर काढू दिले नाही. पूर्ण स्पर्धेत आपल्या कल्पक चढायांनी प्रतिस्पर्ध्यांच्या बचावफळीला हैरान करणाऱया दादा आव्हाडच्या सलग तीनदा जबरदस्त पकडी करून डी ऍण्ड डी टायटन्सने हमसे ना टकराना असा इशाराच जणू कुर्ला किंग्जला दिला.
 
पहिल्या डावात डी ऍण्ड डी टायटन्सच्या बचावफळीने कुर्ला किंग्जचे कंबरडे मोडत 14-7 अशी 7 गुणांची जबरदस्त आघाडी  घेतली होती. त्यामुळे विजयाचे पारडे डी ऍण्ड डी टायटन्सच्या बाजूने झुकताना दिसत होते. मात्र मध्यंतरानंतर कुर्ला किंग्जच्या आकाश कदमने सुरेख चढाया करून सामन्यात रंगत आणली. 7 गुणांनी मागे पडलेल्या कुर्ला किंग्जने पुढच्या पाच मिनीटात गुणसंख्या 14-17 अशी केली. तेव्हा डी ऍण्ड डी टायटन्सवर लोणची नामुष्की होती. मैदानात फक्त त्यांचा एकटा निलेश चिंदरकर होता. तेव्हाच निलेशची पकड करून डी ऍण्ड डी टायटन्सवर लोण लादण्याच्या प्रयत्नात तो कुर्ला किंग्जच्या पकडीतून निसटला. त्यामुळे कुर्ला किंग्जचे बरोबरी साधण्याचे प्रयत्न लांबणीवर पडले. त्यानंतर डी ऍण्ड डी टायटन्सच्या आकाश गायकवाडने जोरदार चढाई करून संघाला पुन्हा आघाडीवर नेले.



त्यामुळे शेवटची 5 मिनीटे असताना डी ऍण्ड डी टायटन्सकडे 21-16 अशी मोठी आघाडी होती. फक्त त्यांच्या खेळाडूंना शांतपणे खेळण्याची गरज होती. पण तेच डी ऍण्ड डी टायटन्सला जमले नाही. त्यातच पूर्ण डावात अपयशी ठरलेल्या दादा आव्हाडने एकाच चढाईत दोन गुण आणून सामन्यात आणखी चुरस आणली आणि डी ऍण्ड डी टायटन्सवर अनपेक्षितपणे लोण चढवला. येथेच सामन्याला खरी कलाटणी मिळाली आणि कुर्ला किंग्ज पुन्हा जागा झाला. 


शेवटची दोन मिनीटे असताना गुणफलक 22-22 असा बरोबरीत आणण्याचा करिश्मा दादान करून दाखवला. त्यानंतर सुरू झाला जीवघेणा संघर्ष. मग पुढे टायटन्सने आघाडी घेतली आणि त्याची बरोबरी दादाने साधून दिली. शेवटचा मिनीट होता. आकाश कदमने एक गुण मिळवून कुर्ल्याला पूर्ण सामन्यात 24-23 असे प्रथमच आघाडीवर नेले. त्यानंतर शेवटचे काही सेकंद शिल्लक होते. शेवटची चढाई निनाद तावडे करतो. त्याच्यावर संघाला विजय मिळवून देण्याचे फार मोठे आव्हान असते. पण त्या आव्हानाच्या दबावाखाली हा जबरदस्त चढाईपटू स्वताच लॉबीच्या बाहेर पडतो आणि स्वयंचीत होतो. 


एका थरारक सामन्याचा शेवट असा अनपेक्षित होतो. डी ऍण्ड डी टायटन्सला आघाडी मिळवून देणारा निनाद बाद झाल्यामुळे कुर्ला किंग्जने महामुंबई कबड्डी लीगच्या जेतेपदावर 25-23 असे शिक्कामोर्तब केले. त्याअगोदर झालेल्या लढतीत डी ऍण्ड डी टायटन्सने लालबाग लायन्सचे कडवे आव्हान पहिल्या डावातील पिछाडीनंतरही 31-18 असे मोडित काढले होते.


हा सामना सुद्धा बरोबरीने खेळला जात होता. पण शेवटच्या आठ मिनीटात लालबाग लायन्सकडून अनेक चुका झाल्या आणि 15-15 असा बरोबरीत असलेला खेळ डी ऍण्ड डी टायटन्सच्या सुशांत मांडवकर आणि अमीर धुमाळने 31-18 असे संपुष्टात आणले. पहिल्यावहिल्या महामुंबई कबड्डी लीगचा पुरस्कार वितरण सोहळा संयोजक आणि नगरसेवक बाळा तावडे, कमलेश यादव, अभिनवचे अंकुश मोरे, रविंद्र करमळकर आणि ओ.एच. मिडियाचे मंगेश वरवडेकर, संदीप चव्हाण आणि रणजीत दळवी यांच्या उपस्थितीत पार पडला.