लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानं मुख्य प्रशिक्षकाची निवड केली आहे.
मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वे टीमचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानं याबाबतचं ट्विट करून माहिती दिली आहे. याआधी मेमध्ये झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० ट्राय सीरिज आणि झिम्बाब्वे पाकिस्तानच्या वनडे सीरिजसाठी लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेचे अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
प्रशिक्षक म्हणून निवड झाल्यामुळे मी आनंदी आहे. नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानं मला दिलेल्या संधीबद्दल मी आभारी आहे, असं लालाचंद राजपूत यांनी पीटीआयला सांगितलं. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानं राजपूत यांच्याशी ३ वर्षांचा करार केला असला तरी या कराराचं प्रत्येक वर्षी नुतनीकरण होणार आहे.
भारतानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात २००७ साली दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी लालचंद राजपूत भारतीय टीमचे व्यवस्थापक होते. तसंच २००८ साली धोनीच्याच नेतृत्वात भारतानं ऑस्ट्रेलियात वनडे ट्रायसीरिज जिंकली. तेव्हाही राजपूत भारतीय टीमचा भाग होते.
२०१६ साली लालचंद राजपूत यांची अफगाणिस्तानचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली. राजपूत यांच्या कारकिर्दीत अफगाणिस्तानला चांगलं यश मिळालं. जून महिन्यामध्ये अफगाणिस्ताननं भारताविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या टीमचे प्रशिक्षकही राजपूत होते.
मागच्या रणजी मोसमामध्ये राजपूत यांनी आसामचं प्रशिक्षकपद भुषवलं. मुंबई प्रिमिअर लीगमध्ये राजपूत एका टीमचे सल्लागारही होते. तसंच मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्येही राजपूत यांनी पदं भुषवली आहेत.
लालचंद राजपूत यांनी भारताकडून २ टेस्ट मॅच आणि ४ वनडे मॅच खेळल्या आहेत. तसंच रणजी ट्रॉफीमध्ये राजपूत मुंबईकडून खेळायचे.