Babar Azam Record Prior To India Vs Pakistan Match: ऑक्टोबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या सामन्याची तारीख 15 ऑक्टोबर असली तरी ती बदलली जाण्याची चर्चा आहे. दरम्यान त्यापूर्वी भारत आणि पाकिस्तानचा संघ आशिया चषक स्पर्धेमध्ये आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींना अनेकदा आपल्या पारंपारिक प्रतिस्पर्धाविरोधात खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. एकीकडे या सगळ्या चर्चा सुरु असताना आता या सामन्यांबद्दल प्रतिक्रियाही समोर येऊ लागल्या आहेत. तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात कोणकोणते खेळाडू चमकतील याचीही चर्चा सुरु झाली आहे. असं असतानाच आता भारतीय संघाची टेन्शन वाढवणारी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमसंदर्भातील एक बातमी समोर आली आहे.


13 चेंडूंमध्ये 62 धावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा हुकूमी एक्का असलेल्या बाबर आझमने सोमवारी, 7 ऑगस्ट रोजी लंका प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या सामन्यात खेळताना तुफान फटकेबाजी केली. या फटकेबाजीच्या जोरावर त्याने दमदार शतक झळकावत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोलंबो स्ट्रायकर्स संघाकडून आझम लंका प्रीमिअर लीग खेळत आहे. गाले टायटन्सविरुद्धच्या सामन्यात बाबरने 59 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 5 षटकार लगावत 104 धावांची खेळी केली. म्हणजेच त्याने केवळ 13 चेंडूंमध्ये 62 धावा केल्या. 


केवळ दुसरा खेळाडू


बाबरने कोणत्याही टी-20 सामन्यामध्ये झळकावलेलं हे 10 वं शतक आहे. वेस्ट इंडीजचा माजी सलामीवीर आणि युनिव्हर्सल बॉस नावाने ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलनंतर केवळ बाबरलाच टी-20 मध्ये 10 शतकं झळकावण्याचा विक्रम करता आला आहे. अर्थात ख्रिस गेलपासून बाबर फार दूर असला तरी टी-20 मधील शतकांमध्ये 2 आकडी मजल मारणारा बाबर हा केवळ दुसराच खेळाडू आहे. गेलच्या नावावर तब्बल 22 टी-20 शतकं आहेत. बाबरच्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे प्रत्येक 8 शतकांसहीत विराट कोहली, एरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि मायकल क्लिंगर यांचा समावेश आहे. 


संघाचा विजय अन् इतरांना टेन्शन


बाबारच्या खेळीच्या जोरावर कोलंबो स्ट्रायकर्सने टायटन्सच्या संघाविरोधातील सामना 7 विकेट्स राखून जिंकला. टायटन्सने दिलेलं 188 धावांचं आव्हान स्ट्रायकर्सच्या संघाने 1 चेंडू बाकी असतानाच गाठलं. बाबरचा या सामन्यातील फॉर्म आणि फटकेबाजी पाहून आगामी आशिया चषकामध्ये त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे. मात्र त्याचवेळी ही भारतासहीत इतर सहभागी संघांसाठी धोक्याची घंटा आहे. बाबरची ही कामगिरी नक्कीच सर्व गोलंदाजांना घाम फोडणारी असून तो याच फॉर्ममध्ये आशिया चषक स्पर्धेत खेळू नये अशीच विरोधी संघांची इच्छा असेल यात शंका नाही.