चेन्नई : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यानंतर विजय शंकरनं वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये स्वत:ची दावेदारी आणखी मजबूत केली आहे. या दोन्ही दौऱ्यांमध्ये धोनीनं आव्हानाचा पाठलाग कसा करायचा ते शिकवलं, अशी प्रतिक्रिया विजय शंकरनं दिली आहे. विजय शंकरनं न्यूझीलंड दौऱ्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. धोनीसारख्याच भारताला मॅच जिंकवून देण्याची इच्छाही विजय शंकरनं व्यक्त केली. विजय शंकर, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांची वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड होऊ शकते, असे संकेत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिले होते. यामुळे विजय शंकरकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंड दौऱ्यावरून परतल्यावर विजय शंकर म्हणाला 'वरिष्ठ खेळाडूंची साथ मिळाल्यामुळे मी खुश आहे. या खेळाडूंना मॅचची तयारी करताना मी पाहिलं. धोनीला आव्हानाचा पाठलाग करताना पाहिलं, यातून खूप शिकायला मिळालं. लक्ष्याचा पाठलाग करताना इनिंगला कसा आकार द्यायचा हे समजलं. धोनीच्या मानसिकतेतूनच बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.'


'विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूममध्ये असणं हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं होतं. धोनी, विराट आणि रोहितसोबत ड्रेसिंग रुममध्ये राहण्याचा अनुभव खूप चांगला होता. वरिष्ठांना बघूनच बऱ्याच गोष्टी शिकता येतात', असं वक्तव्य विजय शंकरनं केलं.


न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मध्ये तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवल्यामुळे विजय शंकरनं हैराण झाल्याची कबुली दिली होती. टीम प्रशासनानं मला याबद्दल सीरिज सुरु व्हायच्या आधीच माहिती दिली होती. मी हैराण होतो, तेवढाच मी खुशही होतो. टी-२०मध्ये तुम्हाला वेळ घेऊन खेळता येत नाही. तुमचा दृष्टीकोन सकारात्मक पाहिजे, असं विजय शंकरनं सांगितलं.


तिसऱ्या टी-२०मध्ये भारताला विजय मिळवून न दिल्याबद्दल विजय शंकरनं नाराजी व्यक्त केली. 'मला आणखी काही रन करायला पाहिजे होत्या. तिसऱ्या वनडेमध्येही मला टीमला विजय मिळवून देता आला नाही. यामुळेही मी निराश झालो. मला लवकर शिकायची आणि चांगलं प्रदर्शन करण्याची गरज आहे', अशी प्रतिक्रिया विजय शंकरनं दिली.