खेळाडू ठरला परीस; अश्रू पुसलेल्या टिश्यूला कोट्यवधींची किंमत
याला म्हणायचं तरी काय?
ऋचा वझे, झी मीडिया : एका टिश्यू पेपरची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते. फार तर पाच किंवा 10 रूपये. मात्र जगात एक असा टिश्यू पेपर आहे ज्याची किंमत तब्बल साडेसात कोटी रूपये इतकी आहे. या टिश्यूमध्ये असं आहे तरी काय? पडला ना तुम्हालाही प्रश्न ?
आपण हात पुसण्यासाठी, चेहरा पुसण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करतो. तसं पाहिलं तर टिश्यू म्हणजे एक साधा कागद, ज्याचा एकदा वापर केल्यानंतर फेकून देण्यात येतो. मात्र याच टिश्यूला आता कोट्यवधींचा भाव आला आहे. तोही एक दोन कोटी नव्हे तर तब्बल साडेसात कोटी रूपये.
बसला ना आश्चर्याचा धक्का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कदाचित हा टिश्यू सोन्याचा असेल, त्याला हिरे-माणिक जडलेले असतील, मात्र असं अजिबात नाही. हा टिश्यू साधासुधा टिश्यू नाही, तर तो आहे जगातील एका महान फूटबॉलपटूचा. ज्याचं नाव आहे लिओनल मेस्सी. त्याचं झालं असं अर्जेंटिनाच्या या महान खेळाडूनं बार्सिलोनातून बाहेर पडण्याची केलेली घोषणा सर्वांसाठीच एक भावनिक क्षण होता. आपल्या निरोप समारंभाच्या भाषणात मेस्सीला अश्रू अनावर झाले. पत्नी अँटोनेलानं अश्रू पुसण्यासाठी त्याला टिश्यू पेपर दिला. हाच तो टिश्यू आहे ज्याला कोट्यवधींचा भाव आला आहे. मेस्सीच्या अश्रूनं भरलेल्या टिश्यूची ऑनलाईन विक्री केली जाणारंय. त्यासाठी जाहिरातही देण्यात आलीय.
कोण विकतंय हा टिश्यू
मैकेडुयो नावाचा एक व्यक्ती मेस्सीच्या अश्रूंचा टिश्यू विकत आहे. मेस्सीचा अनुवंश (जेनेटिक) या टिश्यूमध्ये आहे. ज्यामुळे लोकांना फुटबॉल खेळाडूचा क्लोन करता येईल. या ३४ वर्षीय खेळाडूने बार्सिलोनासोबत २१ वर्षे घालवल्यानंतर आता निरोप दिला. यानंतर तो त्याच्या पॅरिस सेंट-जर्मन या नव्या संघासाठी खेळेल.
मेस्सीच्या टिश्यूला कोट्यवधींचा भाव आल्यानं त्याचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. मेस्सीनं बार्सिलोनाकडून खेळताना 778 सामन्यांमधून तब्बल 672 गोल केलेत आता तो पॅरिस सेंट जर्मनकडून खेळणारंय. फुटबॉलविश्वात मेस्सीची किती क्रेझ आहे हे त्याच्या अश्रूंनी भारलेल्या टिश्यूच्या किंमतीवरून लक्षात येईल.