लोकेश राहुलनं द्रविडचं १६ वर्ष जुनं रेकॉर्ड मोडला
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये लोकेश राहुलला बॅटनं चमकदार कामगिरी करता आली नाही पण...
साऊथम्पटन : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये लोकेश राहुलला चमकदार कामगिरी करता आली नाही. चारही टेस्टच्या एकाही इनिंगमध्ये राहुलला अर्धशतकही करता आलं नाही. ४ टेस्ट मॅचमध्ये राहुलनं फक्त ११३ रन केले आहेत. पण स्लिपमध्ये फिल्डिंग करताना मात्र राहुलनं शानदार कामगिरी केली आहे. चौथ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशीही राहुलनं स्लिपमध्ये २ कॅच पकडले.
पहिल्या टेस्टमध्ये भारतानं शिखर धवनवर विश्वास दाखवला होता. पण धवननं स्लिपमध्ये कॅच सोडल्यानंतर टीमनं लोकेश राहुलवर विश्वास दाखवला. राहुलही टीमच्या या विश्वासाच्या पात्र ठरला. तिसऱ्या टेस्टमध्ये लोकेश राहुलनं स्लिपमध्ये तब्बल ७ कॅच पकडले होते. या मॅचमध्ये भारताचा विजय झाला होता.
चौथ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी राहुलनं स्लिपमध्ये २ कॅच पकडल्यानंतर १६ वर्ष जुना राहुल द्रविडचा रेकॉर्ड मोडला आहे. लोकेश राहुलचा या सीरिजमधला हा ११वा कॅच होता. कोणत्याही भारतीय फिल्डरची इंग्लंडमधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. २००२ सालच्या इंग्लंड दौऱ्यात राहुल द्रविडनं १० कॅच पकडले होते.