LSG vs PBKS, IPL 2024 : गब्बर भिडला, पण मयंक नडला..! पंजाबचा पराभव करत लखनऊने फोडला विजयाचा नारळ
LSG vs PBKS, IPL 2024 : लखनऊ सुपर जायएन्ट्सने पंजाब किंग्जचा पराभव करत पहिला विजय नोंदवला. त्याचबरोबर लखनऊने पाईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.
Lucknow Super Giants vs Punjab Kings : लखनऊ सुपर जायएन्ट्स आणि पंजाब किंग्ज (LSG vs PBKS) यांच्यात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाणा क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा 11 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात लखनऊने पंजाब किंग्जचा पराभव करून विजयाचा नारळ फोडला आहे. तर पंजाबचा सलग दुसरा पराभव झालाय. लखनऊने दिलेलं 200 धावांचं आव्हान पार करताना पंजाबला 178 धावाच करता आल्या. त्यामुळे लखनऊने 21 धावांनी विजय मिळवत विजयाचा नारळ फोडला आहे. लखनऊकडून युवा मयंक यादवने (Mayank Yadav) धारदार आणि भेदक गोलंदाजी करत 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
लखनऊने दिलेलं 200 धावांचं आव्हान पूर्ण करताना पंजाबच्या सलामीवीरांनी तगडी सुरूवात करून दिली. कॅप्टन शिखर धवनने स्वत: जबाबदारी घेतली अन् आक्रमक खेळी केली. तर त्याला जॉनी बेअरस्टोने खंबीर साथ दिली. 11 ओव्हरमध्ये पंजाबने 100 चा आकडा देखील पार केला. मात्र, निकोसलने डेब्यू मॅन मयंक यादवला बॉल सोपवला अन् सामन्याचं पारडं लखनऊच्या दिशेने झुकलं. मयंक यादवने जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा यांना तंबूत पाठवलं अन् पंजाबचा संघ अडचणीत सापडला. 150 प्लसच्या स्पीडने गोलंदाजी करणाऱ्या मयंक यादवने पंजाबचे लचके तोडले. त्यानंतर मोहसिन खान पंजाबला दोन धक्के दिले अन् सामना रोमांचक स्थितीत आणला. पंजाबला अखेरच्या 2 ओव्हरमध्ये 48 धावांची गरज होती. मात्र, लियाम लिव्हिंगस्टोनला चमक दाखवता आली नाही. अखेर लखनऊने सामना खिशात घातला.
प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये लखनऊने 199 धावांपर्यंत मजल मारली. लखनऊकडून डिकॉकने दमदार सुरूवात करून दिली. त्याने 54 धावा करून लखनऊला तडाकेबाज सुरूवात करून दिली. त्यानंतर पेडिक्कल अन् स्टॉयनिस फेल गेल्यानंतर निकोलस पूरनने 42 धावांचं योगदान दिलं. राबाडाने कॅप्टन पुरनला बाद केल्यानंतर कृणाल पांड्याने आपल्या हटके स्टाईलने आक्रमण सुरू केलं. कृणालने 43 धावांची मोलाची खेळी केली. त्यात त्याने 4 फोर अन् 2 सिक्स मारले. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे लखनऊला 199 धावा उभा करता आल्या. पंजाबच्या गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंगने 2, सॅम करनने 3 आणि रबाडा आणि चहरने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
केएल राहुल कॅप्टन्सी सोडणार?
केएल राहुल दुखापतीमधून पूर्णपणे बरा झाला नाही, अशी माहिती समोर येत आहे. केएल राहुल या सामन्यात कॅप्टन नव्हे तर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळला. तर निकोलस पूरनने टीमची जबाबदारी सांभाळली. बराच काळ चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये केएल राहुलला थोडा ब्रेक द्यायचा आहे, असं निकोलस पूरनने म्हटलंय. त्यामुळे आता केएल राहुल काही सामने एम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळण्याची शक्यता आहे. अशातच आता राहुल संघाची जबाबदारी पूर्णपणे निकोलस पूरनकडे सोपवणार का? असा प्रश्न विचारला जातोय.
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, निकोलस पूरन (C), मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ.
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (C), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग