मुंबई : २३ मार्चपासून आयपीएलच्या १२व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. यावेळी पहिली मॅच धोनीची चेन्नई आणि विराटच्या बंगळुरूमध्ये होणार आहे. यंदाची आयपीएल वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेचच भारतीय टीम वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला जाणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूला वर्ल्ड कपसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची शेवटची संधी असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा घरच्या मैदानात पराभव झाला. या पराभवामुळे वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याचा संभ्रम आणखी वाढला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताने अंबाती रायुडू, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना चौथ्या क्रमांकावर खेळवलं. पण तिघांनाही चौथ्या क्रमांकावर खेळण्यात अपयश आलं. आयपीएलदरम्यान मात्र धोनी हा विराटला मदत करु शकतो.


आयपीएलमध्ये अंबाती रायुडू हा धोनीच्या चेन्नईकडून खेळतो. या मोसमामध्ये धोनीने संधी दिल्यामुळे अंबाती रायुडू फॉर्ममध्ये आला, तर याचा भारताला वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकाचा पेच सोडवण्यास मदत होईल. मागच्या आयपीएलमध्ये अंबाती रायुडू हा जबरदस्त फॉर्ममध्ये होता.


काही महिन्यांपूर्वी अंबाती रायुडूचं भारतीय टीममधलं चौथ्या क्रमांकावरचं स्थान हे निश्चित मानलं जात होतं. विराट कोहलीनेही वर्ल्ड कपमध्ये रायुडू हा चौथ्या क्रमांकावर खेळेल, असं सांगितलं होतं. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे रायुडूवर पुन्हा प्रश्न उपस्थित करण्यात आले.


भारताकडून खेळत असताना धोनी हा नेहमीच कर्णधार विराट कोहलीच्या मदतीला धावून जातो. आता आयपीएलदरम्यानही धोनी रायुडूला संधी देऊन विराटला मदत करु शकतो. रायुडूसोबतच भारतीय टीममध्ये चौथ्या क्रमांकासाठी दिनेश कार्तिक, ऋषभ पंत आणि विजय शंकर यांच्यामध्ये स्पर्धा आहे.