कोलकाता : वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा थोड्याच वेळात होणार आहे. पण त्याआधी भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारी याने दिनेश कार्तिकवर नाव न घेता निशाणा साधला आहे. चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्याने शुभमन गिलला सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं. यावरून मनोज तिवारीने आक्षेप घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'शुभमन गिल ही मॅच खेळत आहे का? आता मला समजलं उद्या वर्ल्ड कपसाठीची टीम निवडली जाणार आहे. कोण म्हणतं हा सांघिक खेळ आहे? कधी कधी डोळ्यासमोर गोष्टी स्पष्ट दिसतात.' असं ट्विट मनोज तिवारीने काल केलं होतं.



'जर एखाद्या खेळाडूने आधीच्या मॅचमध्ये सुरुवातीला बॅटिंग करून ६५ रनची खेळी केली असेल, तर त्या खेळाडूला वरतीच खेळवण्याची माझ्यासारख्या क्रिकेट चाहत्याची अपेक्षा असते. परदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडूंना वरच्या क्रमांकावर बॅटिंग करण्याची संधी दिली पाहिजे', असं मनोज तिवारी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाला.



चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये शुभमन गिलला सातव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्यात आलं. या मॅचमध्ये गिलने २० बॉलमध्ये १५ रन केले. आधीच्या मॅचमध्ये ओपनिंगला आलेल्या गिलने ६५ रनची खेळी केली होती.


वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा आज दुपारी होणार आहे. दुसरा विकेट कीपर म्हणून दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत यांच्यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. तर चौथ्या क्रमांकावर कोण बॅटिंग करणार? याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.