मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आयपीएलच्या इतर मॅचच्या सुरक्षेचे पैसे अजूनही दिलेले नाहीत. माहितीच्या अधिकारात ही गोष्ट समोर आली आहे. अनिल गलगलींनी टाकलेल्या आरटीआयला मुंबई पोलिसांनी उत्तर दिलं आहे. एमसीएने २१.३४ कोटी रुपये दिलेले नाहीत, यामध्ये ५.६१ कोटी रुपयांचं व्याज आहे. हे पैसे २०१८ पर्यंतच्या आयपीएल आणि इतर मॅचना देण्यात आलेल्या सुरक्षेचे आहेत. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये मुंबई पोलिसांनी गृह मंत्रालयाचा ३१ मार्च २०१९चा आदेश मानून, टीम, ठिकाणं, खेळाडू आणि बाकी जागांना सुरक्षा दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आरटीआयबद्दल गलगली म्हणाले, 'सहायक पोलीस आयुक्त दिलीप थोरात यांनी आरटीआयला उत्तर देताना सांगितलं, वनडे आंतरराष्ट्रीय, टी-२० वर्ल्ड कप, टेस्ट आणि महिला वर्ल्ड कपसाठी दिलेल्या सुरक्षेसाठीची रक्कम अजूनही बाकी आहे. दिवसेंदिवस ही रक्कम वाढत चालली आहे.'


पोलिसांनी आयपीएल २०१९ चं बिल अजूनही बनवलेलं नाही, कारण राज्य सरकारकडून अजून कोणताही आदेश आलेला नाही. मागच्या वर्षी मुंबईत झालेल्या ९ मॅचसाठी मुंबई पोलिसांना १.४८ कोटी रुपये देणं होतं. पण एमसीएने अजूनही हे बिल भरलेलं नाही.


'पोलीस ज्या पद्धतीने मॅचसाठी लगेच सुरक्षा देतात, त्या पद्धतीने एमसीएलाही लगेचच बिलाची रक्कम दिली पाहिजे. आयपीएलच्या बिलाची रक्कम लगेच मिळाली पाहिजे, याकडे पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं पाहिजे,' असं मत अनिल गलगलींनी मांडलं.