Ind vs Aus: भारत-ऑस्ट्रेलियात आज निर्णायक लढत; पंतप्रधानांमध्ये रंगली जुगलंबदी
ट्विटरवर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जुगलबंदी रंगताना पाहायला मिळाली.
मुंबई: महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या संपूर्ण स्पर्धेत स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या भारतीय महिलांनी पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आज ऑस्ट्रेलियाला नमवून भारत WT20 World Cup वर नाव कोरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांतील क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही देशांचे पंतप्रधानही याला अपवाद नाही. त्यामुळे ट्विटरवर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जुगलबंदी रंगताना पाहायला मिळाली.
स्कॉट मॉरिसन यांनी मोदींना उद्देशून हा सामना ऑस्ट्रेलियाच जिंकणार, अशा आशयाचे ट्विट केले होते. या ट्विटला रिप्लाय देताना नरेंद्र मोदी यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाना शुभेच्छा दिल्या. मात्र, उद्या (रविवारी) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड निळ्या रंगात न्हाऊन निघेल, असे सांगायलाही मोदी विसरले नाहीत. त्यामुळे आता Ind vs Aus यांच्यातील अंतिम सामन्यात काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना गमावलेला नाही. शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, पूनम यादव, शिखा पांडे यांच्यावर प्रामुख्याने भारताची मदार असेल. ऑस्ट्रेलियसमोर भारताच्या फिरकी गोलंदाजांचे आव्हान असेल.