मुंबई : टेनिस या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक असणारा स्वित्झर्लंडचा खेळाडू रॉजर फेडरर हा अनेक नवोदित खेळाडूंसाठी आदर्श आहे. या खेळात आपलं एक वेगळं आणि कायमचं स्थान प्रस्थापित करणाऱ्या फेडररने आजवर अनेक ग्रँड स्लॅम विजेतेपदं आणि असंख्य पुरस्कारही मिळवले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा या खेळाडूच्या नावे आणखी एक अनोखी अशी नोंद करण्यात आली आहे. ही नोंद म्हणजे एका नाण्याची. पडला ना तुम्हालाही प्रश्न, की ही नोंद आहे तरी कसली? फेडररच्या नावे त्यांच्या देशाकडून एक नाणं तयार करण्यात आलं आहे. फेडररची आतापर्यंतची लखलखणारी कारकिर्द आणि त्या कारकिर्दीतून त्याने देशाला दिलेली नवी ओळख, यासाठी त्याच्या सन्मानार्थ स्वित्झर्लंडच्या सांघिक टकसाळकडून कारकिर्दीत तब्बल २० ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या फेडररचा गौरव करण्यात आला आहे.


स्वित्झर्लंडच्या सांघिक टकसाळ स्वीसमिंटकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. पुढच्या वर्षी म्हणजेच साधारण महिन्याभरात टेनिस स्टार रॉजर फेडररच्या सन्मानार्थ २० स्वीस फ्रँकच्या नाण्याचं अनावरण करण्यात येईल.



नाण्याविषयीची ही माहिती देत, इतिहासात असं पहिल्यांदाच होत आहे की एखाद्या व्यक्तीच्या हयातीतच त्याच्या नावे एक नाणं सर्वांपर्यंत पोहोचत त्याला सन्मानित करण्यात येत आहे. खुद्द फेडररनेही सोशल मी़डियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट करत, या सन्मानासाठी सर्वांचे आभार मानले. त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्याची प्रतिकृती असणारं नाणं नेमकं कसं दिसतं हेसुद्धा पाहायला मिळत आहे. तेव्हा आता कधी एकदा अधिकृतपणे या नाण्याचं अनावरण होतं आणि ते आपल्या हाती येतं, याचीच उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागली आहे.