COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup) उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभूत झाल्यानंतर वर्ल्ड कप जिंकण्याची भारताची संधी हुकली. त्यानंतर इंग्लंडने पाकिस्तानतला (Eng vs Pak) नमवत विश्वचषकावर (World Cup) आपलं नाव कोरलं आहे. सेमी फायनलमध्ये मानहानीकारक पराभव झाल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने (Michael Vaughan) भारतीय संघाची खिल्ली उडवली होती. पराभवानंतर वॉनच्या टिकेने भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं. वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ न्यूझीलंडला (New Zealand) पोहोचला आहे. यावेळी माध्यमांना उत्तर देताना कर्णधार हार्दिक पंड्याने प्रत्युत्तर दिलं आहे.


काय म्हणाला होता मायकल वॉर्न (Michael Vaughan)?


"जर मी भारतीय क्रिकेट चालवत असतो तर मी माझा अभिमान सोडून इंग्लंड संघाकडून शिकण्याचा प्रयत्न केला असता. गर्व सोडून आयसीसी स्पर्धा कशा जिंकायच्या हे बीसीसीआयने इंग्लंडकडून शिकायला हवे," असे मायकेल वॉनने म्हटले होते. 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर भारताने काहीही साध्य केले नाही आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडिया नेहमीच अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरली आहे, असेही वॉर्न म्हणाला. आता मायकल वॉनच्या या टीकेला हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सडेतोड उत्तर दिले आहे.


हार्दिक पांड्याचे प्रत्युत्तर


न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याकडे भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 18 नोव्हेंबरपासून भारतीय संघ वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याने वॉर्नला उत्तर देताना त्याचे तोंड बंद केले आहे.


"साहजिकच जेव्हा तुम्ही चांगले खेळत नाही तेव्हा लोकांची मते तयार होतात, ज्याचा आम्ही आदर करतो. मला माहितीयेत लोकांची मते भिन्न आहेत. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर असल्‍याने मला वाटत नाही की कोणाला काही सिद्ध करुन दाखवण्याची गरज आहे.  तुम्ही चांगले खेळण्याचा प्रयत्न करत राहता आणि शेवटी जेव्हा निकाल येणार असतो तेव्हाच असे काही घडते. अशा काही गोष्टी आहेत ज्यावर काम करण्याची गरज आहे. आम्ही  त्यात सुधारणा करू आणि त्यावर काम करू," असे हार्दिकने म्हटलं आहे. 'टी-20 विश्वचषकात कामगिरी निराशाजनक आहे. पण आपल्याला त्याचा सामना करण्याची गरज आहे, असेही हार्दिकने म्हटले आहे.