मुंबई : भारतातल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या मोसमातील पहिली स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफीसाठीच्या टीमची घोषणा झाली आहे. इंडिया ब्लू, इंडिया रेड आणि इंडिया ग्रीन अशा तीन टीम असलेल्या दुलीप ट्रॉफीची सुरुवात १७ ऑगस्टपासून होणार आहे. या टीममध्ये भारताचे माजी लेग स्पिनर नरेंद्र हिरवाणींचा मुलगा मिहीर हिरवाणीचा समावेश करण्यात आला आहे. मिहीर हिरवाणी इंडिया रेडकडून दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पण करेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या रणजी मोसमात मिहीरनं मध्य प्रदेशकडून खेळताना चांगलं प्रदर्शन केलं. या मोसमात तो मध्य प्रदेशचा सर्वाधिक विकेट घेणारा तर रणजी ट्रॉफीमध्ये ४ किंवा त्यापेक्षा अधिकवेळा ५ पेक्षा जास्त विकेट घेणारा दुसरा खेळाडू होता. या कामगिरीचा फायदा मिहीरला दुलीप ट्रॉफीमध्ये निवड होताना झाला. 


आयपीएल लिलावात डावललं 


यावर्षी झालेल्या आयपीएल लिलावामध्ये कोणत्याही टीमनं मिहीरवर बोली लावली नव्हती. पण तीन टीमनी मिहीरला सरावासाठी बोलावलं होतं. या सरावामध्ये मिहीरनं चांगली कामगिरी केली. अखेर पंजाबच्या टीमनं त्याला १३ दिवसांच्या कॅम्पमध्ये संधी दिली. 


लहानपणापासूनच टोमणे ऐकले 


नरेंद्र हिरवाणीचा मुलगा असल्यामुळे निवड झाल्याची टीका माझ्यावर अंडर १६ खेळतानाच व्हायची. त्यावेळी माझ्यावर दबाव यायचा पण अंडर २३ खेळायला सुरुवात केली तेव्हा मला याची सवय झाली. २०१५-१६ च्या मोसमात बडोद्याविरुद्ध मी ९ विकेट घेतल्या. पण ही कामगिरी म्हणजे एकदाच लागलेला जुगार असल्याचंही बोललं गेलं, असं मिहीर म्हणाला. मिहीर हा त्याच्या वडिलांप्रमाणेच लेग स्पिनर आहे. नरेंद्र हिरवाणी हे सध्या नॅशनल क्रिकेट अॅकेडमीमध्ये स्पिनरसाठीचे मुख्य प्रशिक्षक आहेत.


नरेंद्र हिरवाणींचा विश्वविक्रम 


१९८८ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये नरेंद्र हिरवाणींनी १३६ रन देऊन तब्बल १६ विकेट घेतल्या. यातली एक विकेट व्हिव्हियन रिचर्ड यांची होती. या मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये हिरवानी यांनी प्रत्येकी ८-८ विकेट घेतल्या. यानंतर भारत, श्रीलंका आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या ट्राय सीरिजमध्येही हिरवाणी मॅन ऑफ द सीरिज होते. पुढच्या ३ टेस्टमध्ये हिरवाणींनी २० विकेट घेतल्या होत्या. तर पहिल्या ४ टेस्ट मॅचमध्ये ३६ विकेट घेण्याचा रेकॉर्डही हिरवाणींच्या नावावर होता. 


१९९० सालच्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यातही हिरवाणींनी विश्वविक्रम केला होता. तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये हिरवाणींनी लागोपाठ ५९ ओव्हर टाकल्या होत्या. अजूनही टेस्ट क्रिकेटमधला हा सर्वात मोठा स्पेल आहे. 


परदेशात अयशस्वी कामगिरी 


परदेशामध्ये अयशस्वी कामगिरी केल्यामुळे आणि अनिल कुंबळेची भारतीय टीममध्ये निवड झाल्यानंतर हिरवाणींच्या भारतीय टीममध्ये पुनरागमन करण्याच्या आशा मावळल्या. २००१ साली हिरवाणींचं टीममध्ये पुनरागमन झालं पण ११ खेळाडूंमध्ये त्यांना संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये हरभजननं हॅट्रिक घेतली आणि भारतीय क्रिकेटमध्ये हरभजनचं पर्व सुरू झालं.