मुंबई : जपानची राजधानी टोकियो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेआधी भारतीय खेळप्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने जाहीर केलेल्या क्रमवारीत मीराबाईला दुसरं स्थान देण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांच्या 49 किलो वजनी गटात मीराबाई सहभागी होणार असल्याचं आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने जाहीर केलं आहे. या क्रमवारीत पहिलं नाव चीनच्या हाउ झीहुई आहे. याशिवाय आणखी दोन आशियाई महिला खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत. यात इंडोनेशियाची एसा विंडी कँटिका पाचव्या तर व्हिएतनामची वुअँग थी ह्युएन सातव्या क्रमांकावर आहे. 


मीराबाईची दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा


मीराबाई चानूची ही दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. याआधी तिने 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता, पण क्लीन जर्कमध्ये ती अयशस्वी ठरली होती.  


आशियाई चॅम्पियनशिपमध्ये विक्रम


मीराबाईने एशियन चॅम्पियनशिपमध्ये 49 किलो वजनाच्या गटात कांस्यपदक पटकावलं होतं. क्लीन अँड जर्क प्रकरात तीने 119 किलो वजन उचलून जागतिक विक्रम केला. याआधी याप्रकारातील जागतिक विक्रम 118 किलो होता.