वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी फार जबरदस्त फॉर्ममध्ये होता. मोहम्मद शमीला सुरुवातीच्या 3 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने त्या संधीचं सोनं केलं. मोहम्मद शमीने प्रत्येक सामन्यात विकेट घेतल्या. दरम्यान, सेमी-फायनल सामन्यात मोहम्मद शमीने केन विल्यमसनचा सोपा झेल सोडला होता. यानंतर हा सामना भारत गमावेल असं चाहत्यांना वाटलं होतं. पण मोहम्मद शमीने विकेट्स घेत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. दरम्यान झेल सोडला तेव्हा डोक्यात नेमके काय विचार सुरु होते हे मोहम्मद शमीने सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"वानखेडे मैदानात तो सामना होता. जिथे दुसऱ्या डावात सहजपणे धावांचा पाठलाग करता येतो. तिथे 400 धावा करणंही सोपं आहे. जर एखादा फलंदाज सेट असेल तर समोर किती धावा आहेत याचा फरक पडत नाही. जेव्हा मी झेल सोडला तेव्हा सगळी गडबड झाली. मी झेल सोडेन असं वाटलं नव्हंतं. झेल सोडल्यानंतर आता याची विकेट घेतली पाहिजे असं माझ्या डोक्यात सुरु होतं," असा खुलासा मोहम्मद शमीने केला आहे.


पुढे त्याने सांगितलं की, "तो झेल सोडल्यानंतर माझ्यावर फार दबाव होता. जेव्हा माझ्याकडे चेंडू दिला तेव्हा डोक्यात एकच विचार सुरु होता, तो म्हणजे एकतर हा मला 3 षटकार ठोकेल किंवा मी त्याला आऊट करेन". कॅच सोडल्यानंतर गोलंदाजी सुरु कऱण्याआधी रोहित शर्माने काही सांगितलं का? असं विचारण्यात आलं असता मोहम्मद शमी म्हणाला की, "त्या झेलबद्दल आम्ही काही बोललो नाही. याला (केन विल्यमसन) 6 चेंडूत आऊट करायचं, इतकंच डोक्यात होतं. अखेर धीम्या गतीच्या चेंडूवर तो आऊट झाला".


एका क्षणी आता हा ((केन विल्यमसन) जास्त धावा तर करणार नाही ना असंही वाटलं होतं. पण त्यांना आऊट केल्यानंतर मी फार शांत झालो होतो. यानंतर आम्ही अंतिम सामन्याची तयारी सुरु केली होती असं शमीने सांगितलं.