बंगळूरु : सात वर्षांपूर्वी एप्रिलमध्ये झालेल्या वर्ल्डकप फायनलच्या आठवणी ताज्या करतानाम महेंद्रसिंग धोनीने बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात शेवटचा षटकार ठोकत विजय मिळवून दिला. फरक एवढाच होता की त्यावेळी धोनी वर्ल्डकपमध्ये खेळत होता आणि आता आयपीएलमध्ये. धोनीने बुधवारी चेन्नई संघाला बंगळूरुविरुद्ध पाच विकेटनी हरवले. बंगळूरुने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एबी डेविलियर्स आणि क्विंटन डिकॉकच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर ८ बाद २०५ धावा केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्युत्तरादाखल धोनीच्या नाबाद ७० आणि अंबाती रायडूच्या ८२ धावांच्या जोरावर चेन्नईला बंगळूरुविरुद्ध विजय मिळवला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी केली. रायडूने ५३ चेंडूत तीन चौकार आणि आठ षटकारांच्या सहाय्याने ८२ धावा केल्या. मात्र रायडू १८व्या ओव्हरमध्ये बाद झाला. त्यावेळी चेन्नईला अखेरच्या दोन षटकांत जिंकण्यासाठी ३० धावा हव्या होत्या.



मोहम्मद सिराजच्या पुढच्या ओव्हरमध्ये धोनीने षटकार ठोकताना १४ धावा काढल्या. या ओव्हरमध्ये सिराजच्या चेंडूवर धोनीने षटकार ठोकला त्यानंतर सिराज स्वत:ची लाईन विसरला.. त्यानंतर एकामागोमाग एक असे तीन वाईड बॉल टाकले.



सामना संपल्यानंतर विराट कोहली निराश दिसत होता. कोहलीने या पराभवासाठी गोलंदाजांना कारणीभूत ठरवलंय. सामन्यानंतर झालेल्या सोहळ्यात तो म्हणाला, आम्हाला बऱ्याच गोष्टीवर लक्ष द्यावे लागेल. ज्याप्रकारे आमच्या गोलंदाजांनी कामगिरी केली ती स्वीकारार्ह नाहीये. चेन्नईच्या संघाने ७२ धावांवर चार विकेट गमावले होते. मात्र पाचवा विकेट घेण्यासाठी इतक्या धावा देणे चुकीचे आहे. स्पर्धेत पुढे जायचे असेल तर सगळ्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. जर  आम्ही २००चे लक्ष्य वाचवू शकत नाही तर ही समस्या आहे आणि यावर लक्ष देणे गरजेचे असते.