Gautam Gambhir: गौतम गंभीरने शनिवारी सकाळी अचानक राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला. मुळात लोकसभेच्या निवडणूका तोंडावर असल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. दोन वेळचा वर्ल्डकप विजेत्या भारतीय क्रिकेट टीमचा सदस्य गौतम गंभीर भाजपच्या तिकिटावर पूर्व दिल्लीचे विद्यमान खासदार आहे. गौतम गंभीरने 2 मार्चला सकाळी X वर पोस्ट करून राजकारणा सोडण्याबाबत माहिती दिली. 


'हे' सांगितलं कारण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती घेण्यामागे क्रिकेटची बांधिलकी हे कारण सांगितलं आहे. मात्र, दुसरीकडे पक्ष क्वचितच त्याला उमेदवारी देईल असे अनेक मीडिया रिपोर्ट्स समोर आले होते. अशा परिस्थितीत गौतम गंभीरने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा उल्लेख केला आहे.


सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हणाला गौतम गंभीर?


राजकारणाला रामराम म्हणण्यापूर्वी गौतम गंभीरने  ( Gautam Gambhir ) सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये गंभीरने म्हटलंय की, मी पक्षाचे माननीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट संदर्भातील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकेन. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.


निवडणूकांपूर्वी आयपीएलचं आयोजन


या वर्षी देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नसल्या तरीही त्यापूर्वी जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये गौतम गंभीर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 


आयपीएलच्या 17 व्या सिझनसाठी कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीचा मेंटॉर म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली शाहरुख खानच्या मालकीच्या KKR ला दोनदा (2012 आणि 2014) चॅम्पियन बनवले होते. 


क्रिकेटबाबतीत गंभीरच्या काय आहेत कमिटमेंट्स?


टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने डिसेंबर 2018 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. क्रिकेटला अलविदा म्हटल्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तो खासदार झाला. मात्र यावेळी खासदार होऊनही त्यांच्यातला क्रिकेटर कधीच लपू शकला नाही. 


गंभीरने क्रिकेट कॉमेंट्री सुरु ठेवल्या होत्याच. शिवाय आयपीएल दरम्यान कोचिंगही करायचा. एवढेच नाही तर तो निवृत्त खेळाडूंची टी-20 लीगमध्येही सहभागी झाला होता. दरम्यान कोरोना महामारीच्या काळात गौतम गंभीरचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. ऑक्सिजन सिलिंडर, हॉस्पिटलमधील बेड तसेच इंजेक्शन्स अशा अनेक मदती त्याने रूग्णांसाठी केल्या होत्या.