भारत वि श्रीलंका : तिसऱ्या वनडेत धोनी मोडू शकतो हे ३ रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा वनडे सामना आज विशाखापट्टणम येथे खेळवला जातोय. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधलीये. त्यामुळे जो संघ हा सामना जिंकेल तो संघ नवा रेकॉर्ड बनवेल.
विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा वनडे सामना आज विशाखापट्टणम येथे खेळवला जातोय. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधलीये. त्यामुळे जो संघ हा सामना जिंकेल तो संघ नवा रेकॉर्ड बनवेल.
टीम इंडियाने हा सामना जिंकल्यास त्यांचा हा सलग पाचवा विजय असेल. श्रीलंकेने हा सामना जिंकल्यास त्यांचा भारतातील पहिला विजय असेल. या सगळ्यातच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही ३ रेकॉर्ड तोडू शकतो. सध्या त्याची चांगली कामगिरी होतेय.
तिसऱ्या वनडेत धोनीची कामगिरी चांगली झाली तर तो अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करु शकतो.
शतक ठोकताच पूर्ण करेल १०,००० धावा
विशाखापट्टणम येथील सामन्यात धोनीने शतक केल्यास त्याचे वनडे क्रिकेटमधील १० हजार धावा पूर्ण होतील. असे करणारा तो दुसरा विकेटकीपर ठरेल. धोनीने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये ९८९८ धावा केल्यात. त्यामुळे १० हजारांचा पल्ला गाठण्यासाठी त्याला १०२ धावा हव्यात.
सहाव्या नंबरवर फलंदाजी करताना ४ हजार धावा
वनडे क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास धोनीला आवडते. त्याने या स्थानावर फलंदाजी करताना १२१ डावांत ३९३१ धावा केल्यात. ४ हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला ६९ धावांची गरज आहे.
तिसऱ्या सामन्यात षटकारांचे अर्धशतक
वनडे सीरिजमधील तिसऱ्या सामन्यात धोनी साधारणपणे चांगली कामगिरी करतो. धोनीने आतापर्यंत करिअरमध्ये सीरिजच्या तिसऱ्या सामन्यातील ३८ डावांमध्ये ९१.८५च्या सरासरीने १,८३७ धावा केल्यात. तिसऱ्या सामन्यात त्याने आतापर्यंत ४८ षटकार ठोकलेत. षटकारांचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याला २ षटकारांची आवश्यकता आहे.