`महेंद्रसिंह धोनीसारखा कर्णधार पुन्हा होणे नाही`
भारतीय आणि जागतिक क्रिकेटविश्वासाठी तो एक अद्वितीय असा खेळाडू होता.
कोलकाता: क्रिकेटविश्वात महेंद्रसिंह धोनीसारखा कर्णधार पुन्हा निर्माण होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा BCCI प्रमुख आणि भारताचा माजी कप्तान सौरव गांगुली याने व्यक्त केले. महेंद्रसिंह धोनीने MS Dhoni शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर सौरव गांगुलीने प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, धोनीच्या निवृत्तीने क्रिकेटमधील एका पर्वाचा अंत झाला आहे. भारतीय आणि जागतिक क्रिकेटविश्वासाठी तो एक अद्वितीय असा खेळाडू होता. विशेषत: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वगुणांशी बरोबरी होणे खूपच अवघड असल्याचे सौरव गांगुली याने सांगितले.
तसेच यष्टीरक्षणाच्या क्षेत्रात धोनीने भारतीय खेळाडुंसाठी नवा मापदंड घालून दिला आहे. त्याची कारकीर्द असामान्य अशीच होती. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात एकदिवसीय क्रिकेटमधील तडाखेबंद फलंदाजीने धोनीने सर्वांनाच अचंबित करत आपल्यातील अस्सल प्रतिभेची जगाला दखल घ्यायला लावली होती, असेही गांगुलीने म्हटले. धोनीने आज आपल्या निवृत्तीची घोषणा करत क्रीडारसिकांना अनपेक्षित धक्का दिला. यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. धोनीचे अनेक चाहते आणि खेळाडू त्याच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देत आहेत.