मुंबई : आयपीएल २०१८च्या फायनलमध्ये धोनीची चेन्नई आणि केन विलियमसनची हैदराबाद समोरासमोर होत्या. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मेगा-फायनल रंगली. पण या मॅचच्या टॉसच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे प्रेक्षकांना हसू आवरलं नाही. संध्याकाळी साडेसहा वाजता संजय मांजरेकर धोनी आणि विलियमसनबरोबर टॉससाठी मैदानात आला. धोनीनं टॉस उडवल्यानंतर केन विलियमसन टेल म्हणाला. टॉस हेड पडल्यामुळे मांजरेकर यांनी हेड कोण म्हणालं असा प्रश्न विचारला. तेव्हा धोनीनं मांजरेकरांची मस्करी करत केन विलियमसन टेल म्हणाल्याचं सांगितलं. हे सांगितल्यामुळे मांजरेकर गोंधळून गेले. गोंधळलेल्या मांजरेकरांनी पुन्हा धोनीला तू हेड म्हणाल्याचं सांगितलं. धोनीनं पुन्हा केन टेल म्हणाल्याचं स्पष्ट केलं. यानंतर धोनी आणि केन विलियमसन मांजरेकरांना बघून हसायला लागले. मला मूर्ख बनवणं सोडून द्या धोनीनं टॉस जिंकला आहे, असं म्हणत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


वानखेडे स्टेडियमवर 'वॉटसन' वादळ 


शेन वॉटसनच्या वादळी शतकामुळे चेन्नईनं तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. हैदराबादनं ठेवलेल्या १७९ रनचा पाठलाग करताना चेन्नईनं १८.३ ओव्हरमध्ये १८१/२ एव्हढा स्कोअर करत ८ विकेटनं ही मॅच जिंकली. शेन वॉटसननं ५७ बॉलमध्ये नाबाद ११७ रन केल्या. वॉटसनच्या खेळीमध्ये ८ सिक्स आणि ११ फोरचा समावेश होता.


चेन्नईचा तिसऱ्यांदा चॅम्पियन


आयपीएल जिंकण्याची चेन्नईची तिसरी वेळ आहे. याआधी चेन्नईनं २०१० आणि २०११ साली आयपीएल जिंकली होती. तिसऱ्यांदा आयपीएल जिंकण्याच्या मुंबईच्या रेकॉर्डशी चेन्नईनं आता बरोबरी केली आहे. मुंबईनं २०१३, २०१५ आणि २०१७ साली आयपीएल जिंकली होती. दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नईनं आयपीएलमध्ये कमबॅक केलं होतं. आणि आता मोठ्या दिमाखात त्यांनी फायनलमध्ये विजय मिळवला आहे.