विराट कोहलीला धोनीची `शिकवण`, असं करावं नेतृत्व
आयपीएलमध्ये बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीच्या वादळी खेळीमुळे चेन्नईचा विजय झाला.
बंगळुरू : आयपीएलमध्ये बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीच्या वादळी खेळीमुळे चेन्नईचा विजय झाला. एकीकडे धोनीचं नेतृत्व आणि त्याच्या बॅटिंगचं कौतुक होत आहे. तर दुसरीकडे २०६ रनचं लक्ष्यही वाचवता न आल्यामुळे विराट कोहलीवर टीका होत आहे. मॅचनंतर महेंद्रसिंग धोनीनं कर्णधाराचं काम काय असतं हे सांगितलं. मैदानामध्ये आपल्यासोबतच्या बॅट्समनना मदत करण्याबरोबरच मॅच संपवणंही जबाबदारी असते, असं धोनी म्हणाला आहे. धोनीनं बंगळुरूविरुद्ध ३४ बॉलमध्ये ७० रनची खेळी केली. यामध्ये एक फोर आणि ७ सिक्सचा समावेश होता. बंगळुरूनं दिलेल्या २०६ रनचा पाठलाग करताना चेन्नईनं ५ विकेट गमावून आणि २ बॉल राखून विजय मिळवला.
जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असता तेव्हा दुसऱ्या खेळाडूला मदत करायची असते. बॉलर तुमच्यासाठी कोणती रणनिती वापरणार आहे हे सहकाऱ्याला सांगायचं असतं. सोबतच्या बॅट्समनसोबत रन बनवण्याबाबत चर्चा करावी लागते. मैदानात या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, असं धोनी म्हणाला.
धोनी बॅटिंगला मैदानात उतरला तेव्हा चेन्नईला विजयासाठी ६६ बॉलमध्ये १३२ रनची आवश्यकता होती. धोनी आला तेव्हा चेन्नईचा स्कोअर ७४/४ असा होता. धोनी आणि अंबती रायडूमध्ये १०१ रनची पार्टनरशीप झाली. या शानदार प्रदर्शनसाठी धोनीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
डिव्हिलियर्स बॅटिंग करत असताना लक्ष्याचा पाठलाग करणं कठीण वाटत होतं. आम्ही १५-२० रन जास्त दिल्याचं मला वाटलं. सुरुवातीला आम्ही चांगले बॅट्समन गमावले. पण मैदान छोटं होतं. बॉल बॅटवर व्यवस्थित येत होता. तसंच मैदानात दवही आलं होतं, अशी प्रतिक्रिया धोनीनं दिली.
किती ओव्हरमध्ये किती रन हव्या आहेत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये कोण बॉलिंग करेल हे तुमच्या डोक्यात असणं आवश्यक आहे. तसंच या खेळपट्टीवर कोणता बॉलर चांगली बॉलिंग करेल आणि कोणत्या बॉलरला बॉलिंग द्यावी, याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा लागतो, असं वक्तव्य धोनीनं केलं आहे.