मोठी बातमी! महेंद्रसिंग धोनीवर पार पडली शस्त्रक्रीया! मुंबईत कोकिलाबेन रुग्णालयात धोनी ऍडमिट
MS Dhoni Knee Surgery: इंडियन प्रिमिअर लिगचा अंतिम सामना जिंकल्यानंतर धोनी थेट मुंबईला रवाना झाला. त्याने मंगळवारीच यासंदर्भातील तपासणी केली होती. पहिल्याच सामन्यामध्ये धोनीला दुखापत झालेली मात्र त्याने पूर्ण पर्व खेळल्यानंतरच तो उपचारांसाठी मुंबईला आला.
MS Dhoni Knee Injury: इंडियन प्रमिअर लिगमध्ये (IPL 2023) चेन्नई सुपर किंग्सला (CSK Win IPL 2023) पाचव्यांदा विजय मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया पार पडली. सोमवारी मध्यरात्रीनंतर पार पडलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर धोनी थेट मुंबईत दाखल झाला. त्याने कोकिलाबेन रुग्णालयात जाऊन गुडघ्याची चाचणी करुन घेतली होती. त्यानंतर 1 जून रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचं क्रिकबझने म्हटलं होतं. आयपीएल 2023च्या पहिल्याच सामन्यामध्ये धोनीच्या पायाला दुखापत झाली होती.
पंतवर ज्यांनी उपचार केले त्यांचाच घेतला सल्ला
कोकिलाबेन रुग्णालयातील स्पोर्ट्स मेडिसीनचे निर्देशक डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांच्याकडे धोनीने कन्सल्टन्सी घेतली असं क्रिकबझच्या वृत्तात म्हटलं होतं. पारदीवाला यांनीच डिसेंबर महिन्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतवर उपचार केले होते. पादरीवाला हे क्रिडा क्षेत्राशीसंबंधित हाडांच्या दुखापतींवर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
सीएसकेने पाठवली डॉक्टरांची टीम
सामना जिंकल्यानंतर धोनीने चेन्नई सुपर किंग्सच्या संघ व्यवस्थापनाला मुंबईला रवाना होत असल्याचं कळवलं होतं. विशेष म्हणजे ही माहिती मिळताच चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने धोनीच्या कुटुंबियांसोबत डॉ. मधू थोथापील यांच्या नेतृत्वाखालील एक टीम मुंबईला पाठवली. "धोनी डॉक्टर पारदीवाला यांना भेटण्यासाठी गेला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तो पुढील पर्वाच्या आधी पूर्णपणे बरा होईल," असं सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी सांगितलं.
धोनी पुन्हा खेळणार का?
सीएसकेकडून धोनी पुढील पर्व खेळणार का याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. धोनीने यासंदर्भात बोलताना शरीराने साथ दिली तर आपण पुढील पर्व नक्कीच खेळू असं सूचक विधान केलं होतं. यासंदर्भात सीएसकेचे सीईओ विश्वनाथ यांना विचारण्यात आलं असता, "आम्ही अजून याबद्दल विचार केला नाही कारण त्याला अजून फार वेळ आहे. मात्र पुढील पर्व खेळायचं की नाही हा पूर्णपणे धोनीचा निर्णय आहे. तो जसं ठरवेल त्यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. मात्र यासंदर्भात आम्ही काहीही चर्चा केलेली नाही," असं सांगितलं.
कधी झालेली दुखापत
31 मार्च रोजी गुजरात टायन्सविरुद्धच्या आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यामध्ये धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. 19 व्या ओव्हरमध्ये दीपक चाहरने टाकलेला चेंडू आडवण्यासाठी धोनीने डाइव्ह मारली त्यावेळेस त्याला दुखापत झाली होती. मात्र त्यानंतरही धोनीने विश्रांती न घेण्याचा निर्णय घेतला. धोनी अनेक सामन्यांमध्ये गुडघ्याला बॅण्डएड बांधून खेळताना किंवा लंगडताना पाहायला मिळाला.
सेलिब्रेशन नाही
चेन्नईच्या संघाने आयपीएलचा चषक पाचव्यांदा जिंकल्यानंतर मोठं सेलिब्रेशन केलं नाही. संघाचे मालक एन. श्रीनावासन हे या विजयामुळे फार समाधानी आहेत असं सीएसकेचे सीईओ विश्वनाथ यांनी सांगितलं. "आम्ही विजयानंतर मोठं सेलिब्रेशन केलं नाही. सर्व खेळाडू अहमदाबादमधून त्यांच्या त्यांच्या शहरांमध्ये परतले. तसंही आम्ही मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन करत नाही," असं विश्वनाथ म्हणाले.