नवी दिल्ली : महेंद्र सिंह धोनी हा २०१९ चा वर्ल्डकप खेळणार की नाही, अशा चर्चा सुरू आहेत. त्याच्या फिटनेसमुळे त्याच्यावर हे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. धोनीच्या २०१९ चा वर्ल्डकप खेळण्यावर टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवी शास्त्री म्हणाले की, धोनीचा सध्या फॉर्म आणि फिटनेस पाहता तो २०१९चा वर्ल्डकप खेळेल. इतकेच नाही. तर, धोनी असाच जबरदस्त खेळत राहिला तर तुम्ही धोनीशिवाय वर्ल्डकप संघाचा विचारच करू शकत नाहीत, असेही शास्त्री म्हणाला.


३०० वनडेंचा टप्पा ओलांडणाऱ्या धोनीने नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात दमदार कामगिरी केली. पाहता २०१९च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला धोनीची गरज भासणार आहे, असे शास्त्री म्हणाला. धोनी हा सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि कपिल देवसारखाच महान क्रिकेटपटू आहे. त्याच्या कारकीर्दीचा आपण पूर्ण सन्मान राखायला हवा, असेही शास्त्री म्हणाला.


धोनी आजघडीला भारताचा वनडेतील सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे. धोनी आजही तितक्याच चपळाईने यष्टिमागे कामगिरी करत आहे. त्याची फलंदाजीही चांगली होत आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात जे दिसले तो केवळ ट्रेलर होता आणि खरा पिक्चर पुढे आहे, असे शास्त्री म्हणाला.