चेन्नई : महेंद्र सिंग धोनीनं आपल्या कन्या झिवासोबतचा अजून एक व्हिडिओ इन्साग्रामवर शेअर केलाय. यावेळी धोनीनं आपली कन्या झिवासोबत समुद्रकिनारी वाळूमध्ये खेळण्यात दंग असल्याचा व्हिडिओ अपलोड केलाय. धोनी आणि झिवाचा हा व्हिडिओ धोनीची पत्नी साक्षीनं रेकॉर्ड केलाय. या व्हिडिओला १६ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून जवळपास १२ हजार कमेंट्स मिळाल्या आहेत. धोनीचे त्याची कन्या झिवा सोबतचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर नेहमीच धुमाकूळ घालत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यावर धोनी आणि झिवा वाळूमध्ये खेळत होते. धोनीनं या वाळूत खड्डा केला आणि झिवाला यात उभी केली. या खड्ड्यामध्ये झिवा उभी राहिल्यावर धोनीनं तो खड्डा बुजवला. धोनीनं खड्डा बुजवल्यामुळे झिवाचे पाय वाळूत अडकले. लहानपणी आम्हालाही जेव्हा वाळू दिसायची तेव्हा आम्हीही असंच करायचो, असं धोनी म्हणाला.



बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी धोनी चेन्नईला आला होता. या सोहळ्यानंतर धोनी चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यावर गेला होता.


ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे आणि न्यूझीलंड दौऱ्यातल्या वनडे आणि टी-२० सीरिजसाठी धोनीची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज १२ जानेवारीपासून सिडनीमधून सुरु होईल. यानंतर दुसरी वनडे १५ तारखेला ऍडलेडमध्ये, तिसरी आणि शेवटची वनडे १८ तारखेला मेलबर्नमध्ये होईल. यानंतर भारतीय टीम न्यूझीलंडविरुद्ध ५ वनडे मॅचची सीरिज खेळेल. २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत वनडे सीरिज होईल. तर ६, ८ आणि १० फेब्रुवारीला ३ टी-२० मॅचची सीरिज खेळवली जाईल.


नोव्हेंबर महिन्यात धोनी वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटची वनडे खेळला होता. यानंतर वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० टीममध्ये धोनीला संधी देण्यात आली नव्हती. २०१९ च्या वर्ल्ड कपआधी आता फक्त ८ वनडे आणि ३ टी-२० अशा एकूण ११ मॅच राहिल्या आहेत. त्यामुळे धोनीला या सगळ्या मॅच खेळता याव्यात तसंच त्याला मॅच प्रॅक्टिस मिळावी आणि तो वर्ल्ड कपसाठी पूर्ण तयार व्हावा, या कारणासाठी त्याची निवड करण्यात आल्याचं बीसीसीआयमधल्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं होतं.