Team India Victory Parade: मरिन ड्राईव्हवर पाय ठेवायला जागा नाही पण अँब्यूलन्सला काढून दिली वाट, मुंबईकरांनी काळीज जिंकलं; पाहा Video
Team India Victory Parade : एकीकडे टीम इंडियाच्या आगमनाची प्रतिक्षा होत असताना लाखोंच्या गर्दीत एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मुंबईकरांनी अँब्युलन्सला वाट मोकळी करून दिली.
Team India Victory Parade in Mumbai : भारतातले तमाम क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण येऊन ठेपलाय. टी-20 विश्वचषकाचा जगज्जेता भारती क्रिकेट संघ मुंबई विमानतळावर दाखल झालाय. आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंचं क्रिकेटप्रेमींनी जोरदार स्वागत केलं. मुंबई विमानतळासह, ज्या मार्गाने टीम इंडियाची बस जाणार आहे, त्या मार्गावर चाहत्यांची गर्दी झालीय. हे चॅम्पियन्स वानखेडे स्टेडिअमवर विशेष बसनं पोहोचणार आहेत. त्या वानखेडेवरही क्रिकेटप्रेमींची गर्दी झालीय. अशातच आता एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये लाखोंच्या गर्दीतून मुंबईकरांनी वाट मोकळी करून दिली.
मरिन ड्राईव्हवर तोबा गर्दी
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी तोबा गर्दी केलीय. विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत जागोजागी मुंबईकर वर्ल्ड चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी सज्ज झालेत. 2007 साली पहिल्यांदा टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचं स्वागत केलं होतं. यंदा बार्बाडोसमध्ये टीम इंडियानं दुस-यांदा टी 20 वर्ल्डकप जिंकला. आता त्याच विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी मरिन ड्राईव्हवर तोबा गर्दी केलीय.
अँब्यूलन्सला दिली वाट
मरिन ड्राईव्हवर लाखो चाहत्यांचे डोळे रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंच्या आगमानकडे लागले होते. मात्र, त्याचवेळी एक अँब्यूलन्स गर्दीमध्ये अडकली. त्यावेळी मुंबईकरांनी अँब्यूलन्सला वाट मोकळी करून दिली अन् अँब्यूलन्सला गर्दीतून बाहेर काढलं. त्याचा व्हिडीओ झी 24 तासच्या कॅमेरामध्ये शूट झाला आहे.
पाहा Video
टी-20 वर्ल्ड चॅम्पियन्सना घेऊन आलेल्या विमानाचं यावेळी अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. धावपट्टीवर उतरल्यानंतर विमानाला दोन्ही बाजूंनी पाण्याचे फवारे सोडून खास सलामी देण्यात आली. विशेष प्रसंगी स्वागताची विमानतळ प्राधिकरणाची ही खास पद्धत आहे. त्यानुसार जगज्जेता ठरलेल्या भारतीय क्रिकेट संघाला याद्वारे विशेष मानवंदना देण्यात आली. त्यानंतर टीम इंडियाचं मुंबईकरांनी विमानतळावर जंगी स्वागत केलं.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाच्या विजय यात्रेसाठी वानखेडे स्टेडियम व आजूबाजूला परिसरात चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली असून नागरिकांना विनंती आहे की त्यांनी मरीन ड्राईव्हच्या दिशेने जाणे टाळावे, अशी विनंती मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे.