WPL 2024: दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माइलने महिला क्रिकेट इतिहासात नव्या रेकॉर्डची नोंदणी केली आहे. शबनिम इस्माइलने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू फेकला आहे. शबनिम इस्माइलने ताशी 130 किमी वेगाने चेंडू फेकत अशी कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटर होण्याचा मान मिळवला आहे. दिल्लीतील सामन्यात तिने ही कामगिरी करत, यशाची नवी उंची गाठली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या शबनिम इस्माइलने ताशी 132.1 किमी वेगाने चेंडू फेकला. ब्रॉडकास्टवर स्पीड-गनने हा रेकॉर्ड करण्यात आला. 


शबनिम इस्माइलने सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये फेकलेला दुसरा चेंडू आता क्रिकेटच्या इतिहासातील रेकॉर्ड बूकमध्ये नोंदवण्यात आला आहे. तिने हा चेंडू दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगला खेळवला. लॅनिंग हा चेंडू खेळू शकली नाही, आणि फ्रंट पॅडवर लागला. मुंबईने एलबीडब्ल्यूसाठी अपील केली होती, पण अम्पायरने नाकारली. दरम्यान सामना संपल्यानंतर शबनिम इस्माइलला तुला सर्वात वेगवान चेंडू फेकलास हे माहिती आहे का? असं विचारण्यात आलं असता आपण गोलंदाजी करताना मोठ्या स्क्रीनकडे पाहत नाही असं उत्तर दिलं. 


शबनिम इस्माइलने स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरोधात ताशी 128.3 किमी वेगाने चेंडू फेकला होता. दुखापतीमुळे ती मुंबईसाठी काही सामने खेळू शकली नव्हती. पण 5 मार्चला ती पुन्हा एकदा संघात परतली होती. 


शबनिम इस्माइलने आपलाच रेकॉर्ड मोडला


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा रेकॉर्ड शबनिम इस्माइलच्याच नावावर आहे. तिने 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात ताशी 128 किमी वेगाने चेंडू फेकला होता. 2022 एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये तिने दोन वेळा ताशी 127 किमी वेगाला ओलांडलं होतं. 


पण दिल्लीविरोधातील सामन्यात सर्वात वेगवान चेंडू फेकूनही शबनिम इस्माइल गोलंदाजीत कमाल करु शकली नाही. तिने फक्त चार ओव्हर्समध्ये 46 धावा देत, 1 विकेट मिळवली. 


35 वर्षीय शबनिम इस्माइलने 2023 मध्ये क्रिकेटमधून संन्यास जाहीर केला आहे. तिने आपल्या करिअरमध्ये एकूण 241 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ज्यामध्ये 127 एकदिवसीय, 113 टी-20 आणि एक कसोटी सामना आहे. यादरम्यान तिने एकूण 317 विकेट्स मिळवले. दरम्यान पुरुष क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडूचा रेकॉर्ड पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरच्या नावे आहे. 2003 वर्ल्डकपमध्ये त्याने ताशी 161.3 किमी वेगाने चेंडू फेकला होता.