Vijay Choudhari : कुस्तीचा अखाडा गाजवणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विजय नथ्थू चौधरी आता पोलीसांचे क्षेत्रही गाजवतोय. अप्पर पोलीस अधीक्षक पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (Pune Police) अप्पर पोलीस अधिक्षक असलेल्या विजयला कुस्तीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह ' जाहीर करण्यात आलं आहे. राज्य पोलीस विभागात विविध पदांवर कार्यरत असलेल्या आणि आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या कर्तृत्ववान पोलीसांना महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह या प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हॅटट्रिक नोंदविणार्‍या विजय चौधरीने (Vijay Choudhari) महाराष्ट्र पोलीस दलात दोनवेळा सुवर्ण पदक जिंकलं. तसंच 2023 साली कॅनडा इथं झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्र पोलीस दलाचं नाव उंचावलं होतं.  भविष्यातील मोठ्या कुस्ती स्पर्धा तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव असंच उंचाविण्यासाठी मी अथक परिश्रम घेणार असल्याचे विजय चौधरीने सांगितलं. पोलीस खात्याचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विजयवर चोहोबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व सन्मानचिन्ह विजेत्यांचे अभिनंदन केलंय.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जयजीत सिंह, निकेत कौशिक, विश्वास नांगरे पाटील, अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनामुळे विजय चौधरी पोलीस खात्यातही आपला दम घुमवू शकला आहे. सध्या विजय चौधरी आपले गुरू हिंदकेसरी रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदकेसरी आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत आहे.


कोण आहे विजय चौधरी?
विजय चौधरी हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव इथले रहिवाशी आहेत. चाळीसगाव तालुक्यातील सायगाव हे त्यांचे गाव आहे. लहानपणापासून कु्स्तीच धडे गिरवणाऱ्या विजय चौधरी यांनी  2014, 2015 आणि 2016 मध्ये सलग तीन वेळा प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावला. अशी कामगिरी करणारे विजय चौधरी हे महाराष्ट्राचे दुसरे कुस्तीपटू आहेत. याशिवाय त्यांनी अनेक मानाच्या कुस्त्यांच जेतेपद पटकावलंय. राष्ट्रीय सुवर्णपदकावरही त्यांनी नाव कोरलंय. विजय चौधरीहे पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.


3 मे 2017 रोजी महाराष्ट्र सरकारने विजय चौधरी यांना पोलीस उपाधीक्षक म्हणून नियुक्त केलं. विजय चौधरी यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बॅचरल ऑफ आर्ट्सची पदवी घेतली आहे.