बंगळुरू : मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरुनं 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 167 रन केल्या आहेत. मिचेल मॅकलॅनघननं टाकलेल्या 20 व्या ओव्हरमध्ये बंगळुरूनं 24 रन केल्या. या ओव्हरमुळे बंगळुरुला सन्मानपुर्वक स्कोअरपर्यंत पोहोचता आलं. या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय मुंबईच्या बॉलरनी योग्य ठरवला आणि बंगळुरुला धक्के दिले. बंगळुरुचा ओपनर मनन व्होरानं सर्वाधिक 45 रन केल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर मॅकलेनघन, बुमराह आणि मार्कंडेला प्रत्येकी एक विकेट मिळाली.


दोन्ही टीमना विजय आवश्यक


यंदाच्या आयपीएल मोसमात दोन्ही टीमची कामगिरी निराशाजनक झालेली आहे. या दोन्ही टीमनी या मोसमात आत्तापर्यंत 7 मॅच खेळल्या आहेत. यापैकी 2 मॅचमध्ये त्यांचा विजय आणि 5 मॅचमध्ये पराभव झाला आहे. नेट रनरेट चांगला असल्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई सहाव्या आणि बंगळुरू सातव्या क्रमांकावर आहे. ही मॅच हरली तर मुंबई आणि बंगळुरूला प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होणं कठीण होऊन बसेल.