मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमातल्या आता शेवटच्या काही मॅच उरल्या आहेत. तरी प्ले ऑफमध्ये कोणती टीम क्वालिफाय होणार हे अजूनही निश्चित झालेलं नाही. हैदराबादची टीम वगळता अन्य कोणतीही टीम प्ले ऑफसाठी क्वालिफाय झालेली नाही. तर ११ पैकी ७ मॅच जिंकलेली चेन्नई १४ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. हैदराबादबरोबरच चेन्नईची टीमही प्ले ऑफसाठी क्वालिफाय होईल, असं दिसतंय. पण उरलेल्या २ टीमसाठी पंजाब, कोलकाता, मुंबई आणि राजस्थान या ४ टीममध्ये स्पर्धा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबविरुद्धच्या विजयामुळे कोलकाता चौथ्या क्रमांकावर गेली आहे. तर मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली आहे. कोलकात्यानं १२ पैकी ६ मॅचमध्ये विजय मिळवल्यामुळे त्यांच्याकडे १२ पॉईंट्स आहेत. तर पंजाबनं ११ मॅचपैकी ६ मॅच जिंकल्यामुळे त्यांच्याकडेही १२ पॉईंट्सच आहेत. नेट रनरेटमुळे पंजाबची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईनं ११ मॅचपैकी ५ मॅच जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात १० पॉईंट्स आहेत. राजस्थानची अवस्थाही मुंबईसारखीच आहे. राजस्थाननंही ११पैकी ५ मॅच जिंकल्या आहेत. राजस्थानचा नेट रनरेट मुंबईपेक्षा कमी असल्यामुळे ते सहाव्या क्रमांकावर आहेत. पॉईंट्स टेबलमधल्या पहिल्या ४ टीम प्ले ऑफसाठी क्वालिफाय होणार आहेत.


मुंबई-राजस्थानमध्ये महामुकाबला!


शेवटच्या काही मॅचमध्ये सगळ्या टीममध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत असतानाच रविवारी मुंबई आणि राजस्थानमध्ये महामुकाबला होणार आहे. या मॅचमध्ये जी टीम जिंकेल ती प्ले ऑफला क्वालिफाय व्हायच्या आणखी जवळ पोहोचेल. तर हरलेल्या टीमचं प्ले ऑफला जायचं आव्हान आणखी खडतर होईल. त्यामुळे हा सामना म्हणजे हाय व्होल्टेज ड्रामा असणार आहे.