पर्थ : भारताविरुद्धची पहिली टेस्ट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या टेस्टमध्ये शानदार पुनरागमन केलं आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर ११२/५ असा झाला आहे. दिवसाअखेर हनुमा विहारी २४ रनवर नाबाद तर ऋषभ पंत ९ रनवर नाबाद खेळत आहेत. या मॅचमध्ये जिंकण्यासाठी भारताला अजूनही १७५ रनची आवश्यकता आहे. पण भारताची ही अवस्था बघता ऑस्ट्रेलियाच ही मॅच पाचव्या दिवशी जिंकेल हे जवळपास स्पष्ट आहे. फास्ट बॉलरसाठी अनुकूल असणाऱ्या या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा स्पिनर नॅथन लायननं जबरदस्त कामगिरी केली आहे. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये लायननं ५ विकेट घेतल्या, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं आत्तापर्यंत २ विकेट घेतल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचे सगळ्यात यशस्वी बॉलर म्हणून ब्रेट ली, ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न किंवा डेनीस लिली यांचं नाव घेतलं जातं. पण आकड्यांकडे बघितलं तर नॅथन लायन हा भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे.


३१ वर्षांचा नॅथन लायन पर्थमध्ये ८२वी टेस्ट मॅच खेळत आहे. लायननं त्याच्या टेस्ट कारकिर्दीतली बहुतेक बॉलिंग ऑस्ट्रेलियातल्या फास्ट बॉलरना मदत करणाऱ्या हिरव्या खेळपट्टींवर केली आहे. तरीही त्यानं आत्तापर्यंत ३३१ टेस्ट विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच प्रत्येक मॅचमध्ये लायनला ४ पेक्षा अधिक विकेट घेण्यात यश आलंय. पण भारताविरुद्ध मात्र लायनची कामगिरी आणखी चांगली होते. भारताविरुद्ध खेळलेल्या १६ टेस्टमध्ये लायननं ७७ विकेट घेतल्या आहेत. १६व्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये लायन अजून बॉलिंग करत आहे. त्यामुळे त्याच्या विकेटची संख्या ८०पर्यंत जायचीही शक्यता आहे.


भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट


नॅथन लायननं टेस्ट क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. भारतानंतर लायननं इंग्लंडविरुद्ध १८ टेस्टमध्ये लायननं ६५ विकेट घेतल्या. भारत आणि इंग्लंड या दोन देशांविरुद्धच लायनच्या ५० पेक्षा जास्त विकेट आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लायननं ४६ विकेट घेतल्या असल्या तरी त्याची सरासरी फारशी चांगली नाही.


नॅथन लायननंतर ब्रेट लीनं भारताविरुद्ध सर्वाधिक टेस्ट विकेट घेतल्या आहेत. ब्रेट लीनं भारताविरुद्ध १२ टेस्टमध्ये ५३ विकेट घेतल्या. तर रिची बेनो(५२ विकेट), ग्लेन मॅकग्रा(५१ विकेट), मिचेल जॉनसन(४९ विकेट), ग्रॅहम मॅकेन्झी (४७ विकेट),जेसन गिलेस्पी(४३ विकेट) आणि शेन वॉर्न(४३ विकेट) हे भारताविरुद्धचे ऑस्ट्रेलियाचे यशस्वी बॉलर आहेत.


सचिनकडूनही लायनचं कौतुक


सचिन तेंडुलकर यांनही नॅथन लायनचं कौतुक केलं आहे. नॅथन लायनच्या रुपात ऑस्ट्रेलियाला एक शानदार स्पिनर मिळाला आहे. लायनच्या बॉलिंगमध्ये विविधता आहे. तसंच तो खेळपट्टीकडून मिळणारी गती आणि उसळीचा चांगला वापर करतो, त्यामुळे तो प्रभावशाली होतो, असं ट्विट सचिननं केलं.


ऑस्ट्रेलियाचा दुसरा यशस्वी स्पिनर


नॅथन लायन हा ऑस्ट्रेलियाचा दुसरा यशस्वी स्पिनर आहे. ८२ टेस्टमध्ये लायननं ३३१ विकेट घेतले आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जगातल्या २५ बॉलरमध्ये लायनचा समावेश आहे. तर लायन ऑस्ट्रेलियाचा चौथा यशस्वी बॉलर आणि शेन वॉर्ननंतर दुसरा यशस्वी स्पिनर आहे. शेन वॉर्न (७०८ विकेट), ग्लेन मॅकग्रा (५६३ विकेट) आणि डेनीस लिली (३५५ विकेट) यांनी लायनपेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.