मुंबई : पाकिस्तान तहरीके इंसाफ (पीटीआय) पक्षाचे नेते इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनणार आहेत. ११ ऑगस्टला इम्रान खान यांचा शपथविधी होणार आहे. पीटीआय या पक्षाचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान इम्रान खान यांच्या शपथविधीला सुनिल गावसकर, कपिल देव, नवजोतसिंग सिद्धू आणि अभिनेता आमीर खान यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे.


सिद्धूंनी आमंत्रण स्वीकारलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबमधले मंत्री, काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवजोतसिंग सिद्धू यांनी इम्रान खान यांचं आमंत्रण स्वीकारलं आहे. सिद्धू इम्रान खान यांच्या शपथविधीला जाणार आहेत. इम्रान खान सत्तेत आल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील अशी आशा सिद्धूंनी व्यक्त केली आहे.


सिद्धू यांनी इम्रान खान यांचं आमंत्रण स्वीकारलं असलं तरी बाकी सेलिब्रिटी या सोहळ्याला जाणार का नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे. इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी मला निमंत्रित करण्यात आले आहे का, हे मला माहित नाही. परंतु, मी याबाबत एकदा खातरजमा करुन घेईन. निमंत्रण आले असल्यास मला शपथविधी सोहळ्याला जायला नक्की आवडेल. मात्र, हे करताना सरकारची परवानगी आवश्यक आहे, असे कपिल देव यांनी सांगितले. तर सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेता आमिर खान या सोहळ्याला जाणार नाही.


२५ जुलैला झालेल्या निवडणुकीमध्ये पीटीआय हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असला तरी त्यांना बहुमत मिळालेलं नाही. पीटीआयनं निवडणुकीत ११६ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पीटीआयला बहुमताला २२ जागा कमी आहेत. पण पीटीआयकडे बहुमत असल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे. मुत्ताहिडा कयामी मुव्हमेंट पाकिस्तान, ग्रॅण्ड डेमोक्रॅटिक अलायन्स आणि बलुचिस्तान अवामी पक्ष, पीएमएलक्यू आणि अपक्षांशी पीटीआयनं बोलणी केली आहेत.