बास्केटबॉल स्टार कोबी ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
हेलिकॉप्टरने हवेतच पेट घेतला. यानंतर ते झुडपांमध्ये जाऊन कोसळले.
कॅलिफोर्निया: अमेरिकेचा सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याचा रविवारी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. कोबी ब्रायंट याच्यासह ९ जण या अपघातात मृत्यूमुखी पडले. मृतांमध्ये ब्रायंटच्या १३ वर्षीय मुलीचाही समावेश असल्याची माहिती अमेरिकी मीडियानं दिली आहे. कॅलिफोर्नियाच्या कॅलबसास येथे हा अपघात झाला. सकाळी साधारण दहा वाजताच्या सुमारास कोबी ब्रायंट याला घेऊन जात असलेले हेलिकॉप्टर येथील दुर्गम भागात कोसळले.
प्राथमिक माहितीनुसार हेलिकॉप्टरने हवेतच पेट घेतला. यानंतर ते झुडपांमध्ये जाऊन कोसळले. हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळल्यानंतर आजुबाजूच्या झुडुपांनीही पेट घेतला. ही आग विझवताना अग्निशमन दलाला बरेच प्रयत्न करावे लागले.
लॉस एंजालिस येथील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात हेलिकॉप्टरमधील एकही व्यक्ती वाचू शकली नाही. कोबी ब्रायंट बहुतेक वेळा हेलिकॉप्टरनेच प्रवास करायचा.
कोबी ब्रायंट हा लॉस एंजालिस लेकर्स संघाचे प्रतिनिधित्व करायचा. आपल्या २० वर्षांच्या कारकीर्दीत ब्रायंटने पाचवेळा NBA championship rings विजेतेपदावर नाव कोरले होते. १८ वेळा तो 'एनबीए ऑल स्टार' ठरला होता. कोबी ब्रायंट याच्या अकाली निधनामुळे क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.