तिथं नाही Autograph देऊ शकत! नीरज चोप्राचा `हा` किस्सा वाचून वाटेल अभिमान
Neeraj Chopra Classic Act Video: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मात्र या कामगिरीनंतरही त्याचे पाय जमीनीवरच असल्याचा पुरावा देणारा एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Neeraj Chopra Classic Act Video: ऑपिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदावर नाव कोरणारा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 मध्ये (World Athletics Championships) सुवर्णपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्राने 88.17 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं. हंगेरीमधील बुडापेस्ट येथील स्पर्धेत जेतेपद मिळवल्यानंतरही नीरजचे पाय जमीनीवर आहेत हे दाखवणारा एक प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल नीरजने आपल्या कृतीतून आदर व्यक्त केला असून अनेकांनी यासाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
ती चाहती त्याच्याजवळ आली अन्...
नीरजने सुर्णपदक जिंकल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. मैदानामध्येही अनेक चाहत्यांनी त्याच्याबरोबर फोटो काढले. त्याच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. हिंदी भाषेत उत्तमपणे संवाद साधू शकणारी एक हंगेरीयन महिलाही या चाहत्यांमध्ये होती. ही महिला नीरज जवळ आली आणि तिने नीरजकडे ऑटोग्राफ मागितला. नीरजने ऑटोग्राफ देण्यास होकार दिला. मात्र त्यानंतर त्याला समजलं की ही महिला भारतीय राष्ट्रध्वजावर स्वाक्षरी मागत आहे. "वहा नही साईन कर सकता" असं नीरजने या चाहतीला अगदी प्रेमाने सांगितलं. अखेर त्या महिलेने तिने परिधान केलेल्या जर्सीच्या उजव्या बाहीवर नीरजची स्वाक्षरी घेतली. नीरजला भेटता आल्याने आणि त्याने स्वाक्षरी दिल्याने ही चाहती भलतीच खूश होती.
कौतुकाचा वर्षाव
नीरजच्या या कृतीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीरज हा मैदानावर आणि मैदानाबाहेरही त्याच्या वागण्याने चाहत्यांचं मन जिंकत आहे, असं काहींनी म्हटलं आहे.
1)
2)
3)
पाकिस्तानी प्रतिस्पर्धाबरोबर काढला फोटो
सामन्यानंतर नीरज चोप्रा आणि त्याचा पाकिस्तानी प्रतिस्पर्धी अर्शद नदीम फोटोसाठी एकत्र आले होते. दोन देशांमधील वाद विसरत दोन्ही खेळाडूंनी एकत्र येत केलेलं हे फोटोशूट अनेकांचं मन सुखावणारं होतं. विशेष म्हणजे, नीरज चोप्राने फोटो काढला जात असताना अर्शद नदीमला बोलावलं. त्याच्या या कृत्याने नेटकरी भारावले असून, सर्वांची मनं जिंकली आहेत.
रौप्य आणि कांस्य पदक कोणाला?
25 वर्षीय नीरजचा या स्पर्धेतील पहिल्या प्रयत्नात फाऊल झाला. त्यानंतर त्याने दुसऱ्या प्रयत्नात सर्वोत्तम थ्रो केला. त्यानंतर त्याने 86.32 मीटर, 84.64 मीटर, 87.73 मीटर आणि 83.98 मीटरपर्यंत भाला फेकला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमला 87.82 मीटरपर्यंत थ्रो करता आला. चेक प्रजासत्ताकच्या याकूब वालेशने 86.67 मीटर भाला फेकत कांस्य पदकावर नाव कोरलं.