Paris Olympics 2024 Neeraj Chopra Match Timing: भारताला ऑलिम्पिक 2024 मध्ये ज्या खेळाडूकडून पदकाची सर्वाधिक आस आहे तो खेळाडू आज पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. आपण ज्या खेळाडूबद्दल बोलतोय तो आहे, भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा! आपल्या दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्येही नीरज चोप्रा सुवर्णपद जिंकून नवा इतिहास रचेल अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना आहे. आज नीरज पात्रता फेरीमध्ये खेळणार आहे. भालाफेक प्रकारातील शेवटची फेरी 8 ऑगस्ट रोजी म्हणजे गुरुवारी होणार आहे. आज नीरज किती वाजता खेळणार आहे? ही पात्रता फेरी नेमकी कुठे लाइव्ह पाहता येईल जाणून घेऊयात...


वर्षभरात खेळलाय केवळ तीन स्पर्धा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीरजने यंदाच्या वर्षभरामध्ये केवळ 3 स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. नीरजने एप्रिल महिन्यामध्ये दोहा डायमंड लीगमध्ये 88.36 मीटरपर्यंत दूर भाला फेकला होता. ही त्याची यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी आहे. नीरजने पावो नुरमी गेम्समध्ये 85.97 मीटर दूरवर भाला फेकत पहिलं स्थान पटकावलं होतं. त्यानंतर तो 60 टक्के तंदुरुस्त असतानाही फेड्रेशन कप स्पर्धेत सहभागी झाला. या स्पर्धेत त्याने 82.27 मीटर दूर भाला फेकला.


ऐतिहासिक कामगिरीची संधी


नीरजला यंदाही सुवर्णपदक जिंकता आलं तर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये जेतेपद कायम ठेवण्याचा अनोखा विक्रम करणारा तो पाचवा खेळाडू ठरु शकतो. त्याने 2020 च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं होतं. त्याने पुन्हा अशीच कामगिरी केली तर ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक सुवर्णपदकं जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळू ठरेल. मात्र भारतीयांसाठी समाधानाची बाब म्हणजे नीरजच्या प्रतीस्पर्धांना काही समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे नीरजला जिंकण्याची संधी अधिक आहे. नीरज हा पूर्णपणे तंदुरुस्त असून मागील अनेक महिन्यांपासून तो ऑलम्पिकसाठी कठोर मेहनत घेत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याने अनेक स्पर्धांमधून माघार घेतल्याचंही पाहायला मिळालं आहे. नीरजची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी 89.94 मीटरपर्यंत दूर भाला फेकण्याची आहे. 


नीरज सुवर्णपदक जिंकू शकतो का?


मागील तीन स्पर्धांमधील कामगिरी आणि फिटनेसचा विचार केला तर नीरज चोप्राला यंदाही सुवर्णपदक जिंकण्याची उत्तम संधी आहे. नीरजविरुद्ध खेळणारे अनेक भालाफेकपटू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नसल्याने नीरजला अधिक फायदा होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. 


कुठे आणि किती वाजता सामना?


नीरजचा समावेश ब गटामध्ये आहे. आज ब गटाचे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता होणार आहेत. विशेष म्हणजे नीरजबरोबर या गटामध्ये किशोर कुमार जाना हा भारतीय भालाफेकपटूही आहे. हा सामना 18 स्पोर्ट्सबरोबरच जिओ टीव्हीच्या माध्यमातून पाहता येणार आहे. तसेच भारतीय खेळाडूंचे सामने डीडी स्पोर्ट्सवर दाखवले जात असल्याने नीरजचा सामना डीडीवरही पाहता येईल.