`भारताबद्दल तसं बोललोच नाही`, पाकिस्तानच्या क्रिकेटपटूवर स्टोक्स संतापला
इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स पाकिस्तानच्या क्रिकेटपटूने केलेल्या वक्तव्यावर चांगलाच संतापला आहे.
मुंबई : इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स पाकिस्तानच्या क्रिकेटपटूने केलेल्या वक्तव्यावर चांगलाच संतापला आहे. २०१९ वर्ल्ड कपमध्ये भारत इंग्लंडविरुद्ध मुद्दाम हरला, असं मी म्हणालोच नाही, असं स्पष्टीकरण स्टोक्सने दिलं आहे. पाकिस्तानला वर्ल्ड कपमधून बाहेर काढण्यासाठी भारत मुद्दाम इंग्लंडविरुद्ध हरल्याचं स्टोक्स त्याच्या पुस्तकात म्हणाला आहे, असा दावा पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्त यांनी केला होता. वर्ल्ड कपदरम्यानही मी हेच बोललो होतो, असं सांगत बख्त यांनी त्यांचा जुना व्हिडिओ ट्विट केला होता.
सिकंदर बख्त यांच्या या आरोपांवर स्टोक्सने प्रतिक्रिया दिली.. मी असं काही म्हणालोच नाही. माझं वक्तव्य मोड-तोड करून सांगण्यात आल्याची टीका स्टोक्सने केली. बर्मिंघममध्ये झालेल्या या मॅचमध्ये इंग्लंडने भारताला विजयासाठी ३३८ रनचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा ३१ रनने पराभव झाला. २०१९ वर्ल्ड कपमधला भारताचा हा पहिलाच पराभव होता. यानंतर सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं.
इंग्लंडविरुद्धच्या त्या मॅचमध्ये धोनीने केलेल्या बॅटिंगवर टीका करण्यात आली होती. बेन स्टोक्सने त्याच्या पुस्तकात याच मॅचवरून धोनीच्या खेळावर प्रश्न उपस्थित केले. त्या मॅचमधल्या धोनीच्या संथ खेळामुळे मी चक्रावून गेलो, असं स्टोक्स म्हणाला.
इंग्लंडच्या ३३८ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला केएल राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात १३८ रनचं पार्टनरशीप झाली. पण रोहित, विराट आणि हार्दिक पांड्याची विकेट गेल्यानंतर भारताची गती मंदावली. शेवटच्या ११ ओव्हरमध्ये ११२ रनची गरज असतानाही धोनीच्या खेळीने मला धक्का बसल्याचं स्टोक्स म्हणाला.
बेन स्टोक्स याचं 'ऑन फायर' हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात स्टोक्सने वर्ल्ड कपमधल्या इंग्लंडच्या प्रत्येक मॅचचं विश्लेषण केलं आहे. २०१९ वर्ल्ड कपच्या अतंत्य रोमांचक अशा फायनलमध्ये इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनल मॅचमध्ये सुपर ओव्हरही टाय झाल्यामुळे सर्वाधिक बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं.