मुंबई : आयपीएलचा दुसरा टप्पा (IPL 2021) दणक्यात सुरु झाला आहे. गेल्या पाच दिवसात क्रिकेट चाहत्यांना चुरशीचे सामने पाहिला मिळताय. आयपीएलच्या पॉईंटटेबलमध्येही (IPL POINTTABLE) मोठा उलटफेर होत आहे.  दुसऱ्या टप्प्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग दोन पराभव स्विकारावे लागले आहेत. तर पहिल्या टप्प्यात फॉर्मात असलेली ऋषभ पंतची दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) दुसऱ्या हंगामातही आपला फॉर्म टिकवून आहे. पॉईंटटेबलमध्ये पहिल्या चार टीम्स कोणत्या असणार याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण सध्या आयपीएलमधल्या एका खेळाडूने क्रिकेट चाहत्यांबरोबरच क्रिकेट जाणकारांचंही लक्ष वेधून घेतलं आहे. आपल्या धडाकेबजा खेळीने हा क्रिकेटपटू सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीपुढे भले-भले गोलंदाजही निष्प्रभ ठरत आहेत.


या खेळाडूचं नाव आहे व्यकंटेश अय्यर (Venkatesh Iyer). आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्समधून खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरने आपल्या झंझावाती फलंदाजीने सर्वांनाच आपलं चाहते बनवलं आहे. मध्य प्रदेश संघाकडून स्थानिक क्रिकेट खेळणारा व्यंकटेश अय्यर जसप्रीत बुमराह, एडम मिल्ने आणि ट्रेंट बोल्ट सारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांसमोर खेळतानाही अगदी सहज आणि बिनधास्त फलंदाजी करतो.



मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मॅचमध्ये बुमराह, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट सारख्या भेदक गोलंदाजां अय्यर अगदी स्वैर फलंदाजी करत होता. व्यंकटेश अय्यरने 30 चेंडूत 53 धावा फटकावल्या. ज्यात 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात व्यंकटेशला खेळण्याची संधी मिळाली नाही. पण कोरोनानंतर आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा सुरु होताच, व्यंकटेश अय्यरच्या नशिबाने एक वेगळं वळण घेतलं.


व्यंकटेश अय्यरला 20 सप्टेंबर 2021 रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएल पदार्पण करण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचं अय्यरने सोनं केलं. आयपीएलमधल्या आपल्या पहिल्याच सामन्यात अय्यरने 27 चेंडूत एक षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने 41 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीने त्याने प्रत्येकाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं. अय्यर अर्धशतक करु शकला नाही, पण कसर त्याने दुसऱ्या सामन्यात भरून काढली.


23 सप्टेंबरला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अय्यरने पुन्हा एक शानदार खेळी केली. ट्रेंट बोल्टला षटकार ठोकून अय्यरने आपल्या डावाची सुरुवात केली. यानंतर अय्यरने मागे वळून पाहिले नाही आणि अवघ्या 30 चेंडूत 53 धावांची मौल्यवान खेळी केली.कोलकाता नाईट रायराडर्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि कोलकाताच्या या विजयात व्यंकटेश अय्यरचं योगदान मोलाचं ठरलं.



बुमराहने जिंकली चाहत्यांची मनं


व्यंकटेश अय्यरने या डावात तीन षटकार आणि चार चौकार मारले.  अय्यरने जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहलाही सोडलं नाही. पण या वेगवान गोलंदाजाने असे काही केलं ज्याचे चाहते कौतुक करत आहेत.  सामन्यादरम्यान, अय्यरच्या बुटाची लेस सुटली, तेव्हा बुमराहने स्टार असल्याचा कोणताही आव न आणता अय्यरच्या बुटाची लेस बांधली.


मुंबईवर कोलकाता पडली भारी


पहिली फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 6 बाद 155 धावा केल्या, प्रत्युत्तरात केकेआरने 15.1 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. अय्यर व्यतिरिक्त राहुल त्रिपाठीनेही दमदार बॅटिंग केली.  
राहुल त्रिपाठीने 42 चेंडूत नाबाद 74 धावांची खेळी केली. या विजयामुळे कोलकाता संघ पॉईंटटेबलमध्ये थेट चौथ्या स्थानावर पोहचला आहे.