भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकला असला तरी सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) झेलवरुन सुरु असलेला वाद मात्र काही संपताना दिसत नाही आहे. सोशल मीडियावर (Social Media) या कॅचचा व्हिडीओ शेअर करत नवनवे दावे केले जात आहेत. सूर्यकुमार यादवचा पाय सीमेला लागला होता की नाही यावर अद्यापही चर्चा केली जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू शॉन पॉलॉकने (Shaun Pollock) यात काहीच वाद नाही असं सांगितलं असून, आता नवा व्हिडीओ समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेला अंतिम क्षणी 25 चेंडूत 25 धावांची गरज होती. दक्षिण आफ्रिका हा सामना सहज जिंकेल असे अंदाज वर्तवले जात होते. अनेक भारतीय चाहत्यांनीही आशा सोडल्या होत्या. पण शेवटच्या क्षणी जसप्रीत बुमराह, अर्शदीप आणि हार्दिक पांड्या यांनी जबरदस्त गोलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केलं. 


हार्दिक पांड्याने क्लासनेची विकेट मिळवत भारताच्या सामना जिंकण्याच्या आशा पुन्हा जागा केल्या होत्या. पण तरीही डेव्हिड मिलर मैदानात असल्याने भारतीय संघासमोर एक धोका होता. हार्दिक पांड्या शेवटची ओव्हर टाकत असताना दक्षिण आफ्रिकेला 6 चेंडूत 16 धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरने मोठा फटका लगावला. हा चेंडू षटकार जाईल आणि आता दक्षिण आफ्रिकेला 5 चेंडूत 10 धावांची गरज असेल असं वाटत असतानाच सूर्यकुमार यादवने जबरदस्त झेल घेतला. सूर्यकुमार यादवने सीमेपार जाणाऱ्या चेंडूचा झेल घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या झेलमुळे भारताने हा सामना सहजपणे 7 धावांनी जिंकला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by SportsGully (@sportsgully)


सूर्यकुमारचा हा झेल काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेकांनी या झेलची तुलना 1983 वर्ल्डकपमध्ये कपिल शर्मा यांनी घेतलेल्या झेलशी केली. या विजयासह भारताने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला. 


दरम्यान एक्सवर एका चाहत्याने झेलचा स्लो-मोशन व्हिडिओ शेअर केल्याने वादाला तोंड फुटलं. कारण सूर्यकुमारच्या बुटाचा सीमेला स्पर्श झाला होता असा दावा करण्यात आला. पण त्याचा उत्तर देणारा एक व्हिडीओ दुसऱ्या चाहत्याने शेअर करत तोंड बंद केलं आहे. चाहत्याने त्याच्या स्मार्टफोनमध्ये हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. 


सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या नव्या व्हिडीओत सूर्यकुमार यादवच्या बुटाचा कोणताही भाग बाऊंड्री लाईनला स्पर्श होत नसल्याचं दिसत आहे. यावरुन थर्ड अम्पायरने दिलेला निर्णय अत्यंत योग्य असल्याचं सिद्ध झालं आहे.


सूर्यकुमारने या झेलबद्दल इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना सांगितलं होतं की, "रोहित भाऊ सहसा लाँग-ऑनला उभा राहत नाही, पण त्या क्षणी तो तिथे होता. जेव्हा चेंडू येत होता तेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने माझ्याकडे पाहिलं. मी धावत गेलो. झेल घेण्याचा माझा उद्देश होता. तो जवळ आला असता, तर मी त्याच्याकडे चेंडू टाकला असता. पण त्या चार ते पाच सेकंदात जे काही घडले ते मी स्पष्ट करू शकत नाही".