New Zealand vs Sri Lanka: न्यूझीलंड आणि श्रीलंकेमधील (New Zealand vs Sri Lanka) एकदिवसीय सामन्यात प्रेक्षकांना काही अनपेक्षित घटना पाहण्यास मिळाल्या. न्यूझीलंडने हा सामना तब्बल 198 धावांनी जिंकला असला, तरी यामध्ये त्यांच्या चांगल्या खेळीसह नशिबाचीही साथ लाभली असं म्हणावं लागेल. याचं कारण सामन्यातील एक व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. चेंडू पूर्ण वेगात असतानाही न्यूझीलंडचा फलंदाज फिन अॅलेन (Fin Allen) बाद न झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. फक्त श्रीलंकेचे खेळाडूच नव्हे तर समालोचकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिन अॅलेन 9 धावांवर खेळत असताना हा प्रकार घडला. श्रीलंकेच्या Kasun Rajitha ने टाकलेला चेंडू स्टम्पवर लागल्यानंतरही बेल अजिबात हलल्या नाहीत. बेल खाली न पडल्याने अॅलेनला जीवनदान मिळालं. नशिबाने दिलेल्या संधीचा अॅलेननेही चांगला फायदा घेतला आणि अर्धशतक ठोकलं. 


न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 274 धावा ठोकल्या होत्या. श्रीलंकेसमोर 275 धावांचं आव्हान असताना श्रीलंका संघ मात्र फक्त 76 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडने 198 धावांनी हा सामना जिंकत मोठ्या विजयाची नोंद केली. श्रीलंकेची न्यूझीलंडविरोधातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. तसंच आतापर्यंतची हा पाचवी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. 



न्यूझीलंडकडून फक्त चौथा सामना खेळणाऱ्या Henry Shipley ने 5 विकेट्स घेतल्या. दरम्यान श्रीलंका संघ फक्त 19 ओव्हर 5 चेंडूच खेळू शकला. हा त्यांचा आतापर्यंतचा दुसरा छोटा डाव ठरला आहे. 


31 धावांवर श्रीलंकेचे 5 गडी बाद झाले होते. मात्र यानंतर संघ पुन्हा परत सावरू शकला नाही. श्रीलंकेचे फक्त तीन फलंदाज दोन अंकी धावसंख्या करु शकले. दोन महिन्यांपूर्वी भारताने श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव केला होता. भारताने श्रीलंका संघाला 73 धावांवर गारद केलं होतं. 


श्रीलंकेचा कर्णधार Dasun Shanaka याने संघात त्रुटी असल्याचं कबूल करत पुढील दोन सामन्यात त्या सुधारण्याचा प्रयत्न करु असं सांगितलं आहे. फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज असल्याचं त्याने म्हटटलं आहे.