वर्ल्डकपच्या सेमी-फायनलमध्ये विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील50 वं शतक ठोकलं. दरम्यान या सामन्यात विराट कोहली क्रॅम्पने त्रस्त होता. पण इतक्या महत्त्वाच्या सामन्यातही न्यूझीलंड संघाने खेळभावना दर्शवत विराट कोहलीला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. यावरुन ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू सायमन ओडोनेल यांनी नाराजी जाहीर केली होती. आपल्याला न्यूझीलंड संघाचं हे कृत्य आवडलं नसल्याचं ते म्हणाले होते. दरम्यान त्यांच्या या टीकेला न्यझीलंडचा खेळाडू डेरेल मिशेलने उत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"विराट कोहलीला क्रॅम्प आला असताना तुम्ही पुढे जाऊन मदत करण्याची गरज काय होती? जेव्हा त्यांचा संघ 400 धावांकडे वाटचाल करत होता. नियमात खेळणं ही खेळभावना आहे. विराट कोहली तुमची चिरफाड करत आहे आणि तुम्ही पुढे जाऊन मदत करु इच्छित आहात," अशा शब्दांत सायमन ओडोनेल यांनी न्यूझीलंडच्या खेळाडूला सुनावलं होतं.


'विराटला मदत करायची काय गरज होती?,' ऑस्ट्रेलियन खेळाडू न्यझीलंडवर संतापला, 'तुमची खेळभावना...'


 


"विराट कोहलीने आपली बॅट फेकून दिली आणि न्यूझीलंडचे खेळाडू ती उचलण्यासाठी गेले. तुला हॅमस्ट्रिंग आणि क्रॅम्पचा त्रास होत असेल तर स्वत: जाऊन बॅट उचल. आम्हाला चौकार आणि षटकार मारणं बंद कर. ही फार मोठी गोष्ट नाही. हे खेळभावनेच्या विरोधात नाही. हे स्पर्धात्मक आहे. तुम्ही फक्त इतकंच म्हणा की, अच्छा त्याला त्रास होत आहे. तो नीट व्हावा यासाठी तुम्ही कशाला मदत करत आहात?," अशी विचारणा त्यांनी केली होती.


डेरेल मिशेलने दिलं उत्तर - 


"न्यूझीलंडचे खेळाडू म्हणून आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे. आमच्या देशाला ज्या पद्दतीचं क्रिकेट शोभतं तसंच आम्हाला आमच्या मुलांनी मोठे होऊन स्वतः ज्या प्रकारचा खेळ खेळताना पाहायचे आहे तशाच प्रकारचं क्रिकेट आम्हाला खेळायचं आहे," असं मिशेलने संघ मुंबईतून निघत असताना पत्रकारांशी गप्पा मारताना सांगितलं. 


"आम्ही किवीज म्हणून आधीपासून ज्या प्रकारचं क्रिकेट खेळत आहोत तसंच क्रिकेट खेळत राहू. आशा आहे की आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात कसं वागतो, केवळ मैदानावरच नाही तर बाहेरही हे पाहून जग आमचा आदर करेल अशी आशा आहे. ही गोष्ट आहे ज्याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे, म्हणून आम्ही फक्त ब्लॅक कॅप्स बनून राहू आणि आम्ही जे करत आहोत ते करत राहू," असं मिशेल म्हणाला आहे. 


दरम्यान यावेळी त्याने आता संघाचं लक्ष्य बांगलादेशविरोधात होणाऱ्या 2 कसोटी सामन्यांकडे असेल असं म्हटलं आहे.