हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या टी-२० सीरिज सुरु आहे. या सीरिजच्या पहिल्या तिन्ही मॅच जिंकून भारताने आधीच सीरिज खिशात टाकली आहे. या सीरिजदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोन्ही टीममधल्या टी-२० मॅचदरम्यान न्यूझीलंडचा प्रेक्षक स्टेडियममध्ये बसून भारत माता की जय अशा घोषणा देत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेडियममधल्या भारतीय चाहत्यांनी या घोषणा दिल्यानंतर न्यूझीलंडचा चाहत्यानेही भारतीय प्रेक्षकांकडून 'भारत माता की जय' ही घोषणा शिकून घेतली. यानंतर न्यूझीलंडच्या प्रेक्षकानेही जोरजोरात 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या.



न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचचा निकाल सुपर ओव्हरने लागला. सुपर ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी शेवटच्या २ बॉलवर १० रनची गरज होती. रोहित शर्माने या दोन्ही बॉलवर सिक्स मारून भारताला रोमांचक विजय मिळवून दिला. सुपर ओव्हरमध्ये पहिले बॅटिंग करताना न्यूझीलंडने ६ बॉलमध्ये १७ रन केले. त्यामुळे भारताला विजयासाठी १८ रनचं आव्हान मिळालं.


भारताने दिलेल्या १८० रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला २० ओव्हरमध्ये १७९ रनच करता आल्या, त्यामुळे सामना टाय झाला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने ९५ रनची खेळी केली. न्यूझीलंडला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी ९ रनची गरज होती. मोहम्मद शमीच्या या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला रॉस टेलरने सिक्स मारला. यानंतर न्यूझीलंडचा विजय सहज होईल, असं वाटत होतं. पण मोहम्मद शमीने मात्र उत्कृष्ट बॉलिंग करुन न्यूझीलंडचा विजयाचा घास हिरावून घेतला.