वेलिंग्टन : क्रिकेट विश्वात भारतीय संघाची गेल्या काही महिन्यांची कामगिरी पाहता संघाच्या कामगिरीची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे. परदेश दौऱ्यांवर असणारा भारतीय संघ यजमान संघांना नमवत उल्लेखनीय कामगिरी निभावण्यासोबतच काही धमाल कारणांनीही प्रकाशझोतात येत आहे. न्यूझीलंड आणि भारत या दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्याच असाच एक प्रसंग पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फलंदाजी करत भारताने या सामन्यात न्यूझालंडसमोर २५३ धावांचं आव्हान ठेवलं. ज्याचा पाठलाग करत यजमानांनी चिवट झुंज दिली पण, त्यात ते अपयशी ठरले. याचट सामन्यात ३९व्या षटकात केदार जाधव गोलंदाजीसाठी आला तेव्हा नेहमीप्रमाणे यष्टीरक्षणासाठी उभ्या असणाऱ्या धोनीने त्याला न्यूझीलंडच्या खेळाडूला बाद करण्यासाठी मार्गदर्शन केलं. मुख्य म्हणजे स्टंप माईकमध्ये धोनीचे बोल टीपले जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण, यावेळी केदारला मार्गदर्शन करत धोनी चक्क मराठीत, 'पुढे नकोsss.... भाऊ, घेऊन टाक!' असं म्हणाला आणि खुद्द केदारलाही धक्काच बसला. 




सोशल मीडियावर लगेचच या सामन्यातील काही सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल झाला, जो मोठ्या प्रमाणावर शेअरही करण्यात आला. माहिच्या याच मराठमोळ्या अंदाजाविषयी खुद्द केदारनेही एक ट्विट करत आपली प्रतिक्रीया दिली. धोनीशी खास नातं असणाऱ्या केदारने ट्विटमध्ये लिहिलं, 'स्टंपच्या आड धोनी असतो तेव्हा तुम्ही परदेश दौऱ्यातही मायदेशीच खेळत आहात असं वाटतं. पण, यावेळी मात्र हे सारं माझ्यासाठी खऱ्या अर्थाने अनपेक्षित आणि आश्चर्याचा धक्का देणारं होतं.' केदारने या ट्विटमध्ये #घेऊन_टाक असा हॅशटॅगही जोडला आहे. त्यामुळे धोनी आणि केदारच्या या #घेऊन_टाक आणि 'भाऊगिरी'ने खऱ्या अर्थाने साऱ्याची मनं जिंकली हे खरं.