मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमधील पहिली सेमी फायनल मॅच न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात खेळली जाणार आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मॅच मँचेस्टर इथे खेळली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये सातव्यांदा पोहचली आहे. तर न्यूझीलंड टीम सेमीफायनलमध्ये पोहचण्याची ही आठवी वेळ आहे. न्यूझीलंड टीम २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये फायनलमध्ये पोहचली होती. तर टीम इंडिया देखील सेमीफायनल पर्यंत धडक मारली होती.


वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच न्यूझीलंडशी खेळणार आहे.  साखळी फेरीत टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली होती. 


रोहितच्या कामगिरीवर नजर


रोहित शर्मा यंदाच्या वर्ल्डकपच्या सुरुवातीपासूनच धडाकेबाज कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत या वर्ल्डकपमध्ये ५ शतकं ठोकले आहेत. एकाच वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. तसेच आज न्यूझीलंड विरुद्ध त्याला एक रेकॉर्डब्रेक करण्याची संधी आहे. एका वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. 


सचिन तेंडुलकरने २००३ च्या वर्ल्डकपमध्ये ६७३ रन केल्या होत्या. रोहित शर्मा या रेकॉर्डपासून अवघ्या २७ रन दूर आहे. रोहितने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ६४७ रन केल्या आहेत. त्यामुळे रोहित सचिनचा रेकॉर्डब्रेक करतो याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.


बुमराहचे आव्हान 


किवींपुढे जस्प्रीत बुमराहचे आव्हान असणार आहे. बुमराह आपल्या यॉर्कर बॉलिंगने प्रतिस्पर्धी टीमला हैराण करत आहे. सोबतच तो सातत्याने विकेट घेऊन टीम इंडियाच्या विजयात मोलाची कामगिरी करत आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंपुढे बुमराहला सावधरित्या खेळण्याचे आव्हान असणार आहे.


आमनेसामने 


टीम इंडिया आणि न्यूझीलंड आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये ८ सामने खेळले आहेत.यापैकी ३ मॅच इंडियाने जिंकल्या आहेत , तर ४ सामने किवींना जिंकण्यास यश आले. तर १ मॅच रद्द करण्यात आली.  


टीम इंडिया : विराट कोहली (कॅप्टन), केएल राहुल, रोहित शर्मा, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह


न्यूझीलंड: केन विलियमसन (कॅप्टन) , मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, हॅनरी निकोल्स, मॅट हेनरी, टॉम लथम, जेम्स नीशाम, मिशेल सेंटनेर, ट्रेंट बोल्ट, कोलिन डि ग्रँडहोम, लॉकी फर्गयुसन