ब्लॉग रवि पत्की, झी मीडिया मुंबई: नासाच्या अवकाशातल्या अटकळी, क्रिसिलचे बाजाराचे अंदाज ह्या प्रमाणे नितीन मेननचे 
अंपायरिंग निर्णय चुकू शकत नाहीत असं लिहिण्याचं धारिष्टर्य मी अतिशय विचार करून करतोय. नितीन मेनन हा अंपायरिंग मधला विराट कोहली आहे. हि इज सुपरमॅन. बॅट पॅडचे , चेंडू ग्लोव ला लागला का हाताच्या मागच्या भागाला लागला, पायचीतचे अपील चेंडू पायाला वर लागला म्हणून,बॅटच्या कडेला लागला म्हणून, लेग स्टंपच्या काही सेंटीमीटर बाहेर पडला म्हणून क्षणार्धात फेटाळण्याचे तसेच पायचीतचे अपील उचलून धरताना सर्व शक्यता आऊट देण्याच्या आहेत हे ओळखून हा सुपरमॅन इतके अचूक निर्णय देतोय की त्याला फिल्ड वरील DRS म्हणल्यास चूक ठरणार नाही. त्याने आऊट दिला नाही तर DRS घेण्यात काही अर्थ नाही हे जगभरातील सर्व खेळाडूंना आत्तापर्यंत कळले असेल. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी,T20,एकदिवसीय मालिकेचा मालिकावीर नितीन मेननच.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेनन म्हणजे टिपिकल केरळी आडनाव.पण हे मेनन कुटुंब मध्य प्रदेशात कसे आणि कधी स्थायिक झाले ह्याचा इतिहास खुद्द त्यांनाच अचूक माहित असण्याची शक्यता नाही इतक्या वर्षांपूर्वी पासून ते मध्य प्रदेशात आहेत.नीतीनचे वडिल नरेंद्र मेनन सुद्धा आंतरराष्ट्रिय अंपायर होते आणि 4 वन डे सामने त्यांनी केले होते.नितीनने 2006 साली अंपायरिंगची परिक्षा दिली आणि तिथून प्रवास चालू झाला.वयाच्या 23 व्या वर्षी आपण चांगल्या दर्जाचे खेळाडू होऊ इतकी गुणवत्ता आपल्यात नाही त्यामुळे अंपायरिंग मध्ये शिरूया हे समजण्याची प्रगल्भता नितीनकडे होती.


कमालीची एकाग्रता,टोकदार दृष्टीचे वरदान,खेळपट्टीचा अचूक अंदाज,गोलनदाजाचा अभ्यास,निर्भीड आणि निस्पृह निर्णय क्षमता,खेळाडूंच्या रेप्युटेशनचे दडपण न येऊ द्यायचा निडरपणा,निर्णय क्षमतेवर विश्वास आणि ठाम रहाण्याचा निग्रह ह्या सर्वांच्या संयुगाने नितीन मेनन लवकरच जगभरातील खेळाडूंमध्ये सर्वोत्तम अंपायर म्हणून मान्यता मिळवेल ह्यात शंकाच नाही.आत्ता ICC च्या 12 पंचांच्या एलिट पॅनल मध्ये इंग्लंडच्या मायकेल गॉफ यांना सर्वोत्तम पंच म्हणून खेळाडू मानतात.ह्या एलिट पॅनल मध्ये तीन इंग्लंडचे,तीन ऑस्ट्रेलियाचे आणि आफ्रिका,भारत,पाकिस्तान,श्रीलंका,न्यूझीलंड, वेस्ट इंडिज यांचे प्रत्येकी एक पंच आहेत.


38 वर्षीय नितीन मेनन ह्यात सर्वात तरुण अंपायर आहे.इतक्या लहान वयात 50 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने त्याचे झाले आहेत. त्याच्या वाढत्या लौकिकामुळे येणारा T20 वर्ल्ड कप बरोबर ऍशेस मालिकेत सुद्धा तो प्रमुख पंच म्हणून दिसू शकेल. आत्तापर्यंत ICC च्या एलिट पॅनल वर फक्त वेंकटराघवन आणि सुंदरम रवि ह्या दोनच भारतीयांची वर्णी लागली होती. 38 वर्षीय नितीन मेनन आता तिसरा. ऑल द बेस्ट नितीन मेनन. प्राउड ऑफ यू.