नोकरीची 25 वर्षे शिल्लक असताना वडिलांची VRS! अन् त्यानं कांगारुंना आज सळो का पळो केलं...

नितीश कुमार रेड्डीच्या शतकाने भारतीय संघाला मेलबर्न टेस्टमध्ये संकटातून बाहेर काढलं. नीतिशने वॉशिंग्टन सुंदरसोबत पार्टनरशीप करुन शतक पूर्ण केलं. नीतिश कुमारचा हा प्रवास सोपा नाही. नीतिशच्या वडिलांनी दिलेलं योगदान सर्वात महत्त्वाचं आहे.
मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या चौथ्या कसोटीत नितीश कुमार रेड्डीने शानदार शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाचा भक्कम आणि अनुभवी गोलंदाज नितीशपुढे गुडघे टेकताना दिसला. शतक पूर्ण केल्यानंतर नितीशचे वडील मुत्याला रेड्डी यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली. मेलबर्नमध्ये आपल्या मुलाने शतक झळकावल्याचे पाहून वडिलांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. आधी वडिलांनी आपल्या मुलाचे शतक साजरे केले आणि नंतर त्यांचे डोळे पाणावले. त्यांचा ही प्रतिक्रिया सध्या व्हायरल होत आहे.
रेड्डीने 171 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. नितीश आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. त्याच्या शतकी खेळीने टीम इंडियाला मजबूत स्थान मिळवून दिले. नितीशसोबत वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक झळकावून महत्त्वाची भूमिका बजावली. रेड्डी आणि सुंदर यांनी आठव्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करता आली.
नितीश कुमारचा हा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. त्याचा हा प्रवास सोपा नाही. एका सामान्य कुटुंबातून नितीश कुमार आला आहे. त्याच्या वडिलांनी मुलाच्या करिअरसाठी नोकरीची 25 वर्षे शिल्लक असताना सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी फक्त नितीशला मार्गदर्शनच केलं असं नाही तर पालन-पोषण देखील केलं. नितीश आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार म्हणून उदयास आला आहे हे त्याच्या वडिलांच्या मेहनतीचे फळ आहे. नितीश यांनी एका मुलाखतीत असेही म्हटले होते की त्यांचे वडील हे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला की, तो एक उत्कृष्ठ क्रिकेटर होऊ शकतो.
नितीश कुमार रेड्डी यांचे वडील मुत्याला यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मुलाबाबत मोठा खुलासा केला होता. ते म्हणाला होता की, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये भारतातील प्रमुख ऑलराऊंडर हार्दिकसोबत भेट झाल्यानंतर नितीश याचं करिअर पूर्णपणे बदललं. मुत्याला ने सांगितलं की, NCA मध्ये घालवलेलं U19 दरम्यान त्याला हार्दिक पांड्यासोबत बोलण्याची संधी मिळाला. तेव्हापासून तो एक ऑलराऊंडर होऊ इच्छितो.